अमरावती - वरुड, मोर्शी तालुक्यात 34000 हेक्टर वरील संत्र्याच्या बागा सहा महिन्यांपासून भुगर्भातील पाण्याची पातळी खोलवर गेल्यामुळे पुर्ण वाळल्या आहेत. त्यामुळे या वाळलेल्या संत्रा बागांचे त्वरित सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना भरीव मोबदला द्यावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष देवेंद्र भुयार यांनी केली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकऱ्यांनी अमरावतीच्या मोर्शी येथील उपविभागीय कार्यालयावर धडक दिली. संतप्त शेतकरी व कार्यकर्त्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना चार तास घेराव घातल्याने गोंधळ उडाला होता.
विदर्भाचा कॅलोफोर्निया म्हणून ओळख असलेल्या अमरावती जिल्ह्यातील वरुड मोर्शी तालुक्यात संत्रा उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणावर आहे. परंतु गेल्या दोन वर्षांपासून अल्प पावसामुळे संत्रा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. पाण्याची पातळी खोल गेल्याने एक हजार ते बाराशे फूट खोल बोर मारून सुद्धा पाणी लागत नसल्याने संत्रा बागा बाळल्याने शेतकऱ्यांनी त्या तोडून टाकल्या आहे.
शेतकऱ्यांच्या वाळलेल्या संत्रा बागांचे व तोडलेल्या संत्रा बागांचे लवकरात लवकर सर्वेक्षण करण्यात यावे, अशी मागणी घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष देवेंद्र भुयार यांनी शेकडो शेतकऱ्यांना सोबत घेवून अचानक उपविभागीय कार्यालय गाठले. आणि जागेवरच तळ ठोकून उपविभागीय अधिकारी यांना घेरावा घातला. अचानक झालेल्या या आंदोलनाने महसूल प्रशासनाची प्रचंड तारांबळ उडाली होती.