अमरावती - रेमडेसिवीरचा काळाबाजार करणाऱ्या आरोपींना अटक झाल्यावर पोलीस कोठडी मागितली न जाता त्यांची रवानगी थेट न्यायलयीन कोठडीत करणे हा प्रकार अतिशय गंभीर आहे. अशी तक्रार विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस महासंचालकांकडे केली होती. या तक्रारीची दाखल घेत आता पोलिसांनी आता संबंधित आरोपींना पोलीस कोठडी मिळावी यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे.
असा चालायचा काळाबाजार -
शासकीय कोविड रुग्णालयात दाखल कोरोना रुग्णांच्या नावाने 600 रुपये किमतीचे रेमडेसिवीर आणले जायचे. मात्र, ते संबंधित रुग्णांना न देता खासगी रुग्णालयात दाखल रुग्णांना 12 हजार रुपयात विकले जात होते. हा प्रकार बऱ्याच दिवसांपासून सुरू होता. या काळ्या कृत्याचे मुख्य केंद्र तिवसा ग्रामीण रुग्णालय होते.
हेही वाचा - अमरावती जिल्ह्यात लसीकरण मोहिमेला पुन्हा ब्रेक; लसीकरण केंद्रावर शुकशुकाट
आरोप काय? -
या प्रकरणात तिवसा ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन दत्तात्रय मालसुरे, एनआरएचएम अंतर्गत काम करणारा अक्षय राठोड, संजीवनी हेल्थ केअर सेंटरला कार्यरत टेक्निशियन अनिल गजानन पिंजरकर, शासकीय कोविड रुग्णालयातील अटेंडन्ट शुभम सोनटक्के, महावीर हॉस्पिटलमध्ये कार्यरत अटेंडन्ट शुभम किल्लेकर आणि पीडिएममसी रुग्णालयात कंटारी वॉर्डबॉय असणारा विनीत अनिल फुटाणे यांना अटक करण्यात आली होती.
भाजप जिल्हाध्यक्षांनी दिली फडणवीसांना माहिती -
अमरावती जिल्ह्यात रेमडेसिवीरचा काळाबाजार करणारी टोळी पोलिसांच्या हाती लागल्यावर त्यांची पोलीस कोठडी न मागता प्रकरण दाबण्याचा जो प्रकार घडला, असा आरोप भाजपने केला. त्यानंतर भाजपच्या जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी यांनी देवेंद्र फडणवीस यांना सविस्तर माहिती दिली होती. फडणवीस यांनी या गंभीर प्रकरणाबाबत राज्याच्या पोलीस महासंचालकांना पत्र देऊन स्थानिक पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच आपण स्वतः या प्रकरणात लक्ष देऊन कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती.
हेही वाचा - खतांच्या भाववाढीविरोधात बच्चू कडूंची 'थाळी बजाओ' आंदोलनाची हाक