अमरावती - राज्यात कोरोनाचा फैलाव हा झपाट्याने वाढला आहे. मुंबई, पुणे, नागपूरसारख्या शहरात कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी बेड, व्हेंटिलेटर तसेच ऑक्सिजन शिल्लक नाही. त्यामुळे नागपूरसह मध्य प्रदेश, छत्तीसगड आदी जवळपासच्या जिल्ह्यातील 50 पेक्षा जास्त कोरोना बाधित रुग्णांना आता दोन दिवसांपासून अमरावतीमध्ये उपचारासाठी हलविण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. आधीच अमरावतीत कोरोनाची रुग्ण संख्या वाढत असताना, इतर जिल्ह्यातील व राज्यातील कोरोना रुग्ण उपचारासाठी येत आहेत. त्यामुळे अमरावतीच्या आरोग्य यंत्रणेवर अधिक ताण वाढणार आहे. जर बाहेरून रुग्ण उपचारासाठी अमरावतीमध्ये दाखल झाले तर, अमरावती मधील रुग्णांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.
अमरावतीतल्या सुपर स्पेशालिस्ट रुग्णालयांमध्ये 35 कोरोना बाधित रुग्ण उपचारासाठी दाखल झाले आहे. तर अन्य खासगी रुग्णालयातही 15 पेक्षा अधिक रुग्ण उपचारासाठी दाखल झाले आहे. त्यामुळे अमरावतीच्या आरोग्य यंत्रणेवर ताण वाढलेला आहे. रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाने काही निर्णय घेणे जरुरीचे आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये सर्व रूग्णालयांतील कोरोनासाठीच्या बेडपैकी बाराशे बेड हे रुग्णांनी भरलेले आहे. फक्त आता सहाशे बेड हे शिल्लक आहे.