अमरावती - कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये म्हणून लॉकडाऊन करण्यात आले. या लॉकडाऊनमुळे कोरोनाचा प्रसार होत नसला तरी आर्थिक फटका बसताना दिसत आहे. लॉकडाऊनमुळे पपई शेतीला देखील फटका बसतो आहे. उन्हाळा ऋतूमध्ये विदर्भाच्या तापमानात मोठी वाढ होते. त्यामुळे उन्हाळा ऋतूत अमरावतीत पपई पिकांचे उत्पादन चांगले होते. या वर्षी देखील पंकज गायकवाड यांनी १३ एकर शेतात पपई लागवड केली आहे. शेतात पपई बहरलेली आहे. मात्र कोरोना विषाणूमुळे बाजारात व्यापारी येत नसल्याने पपई शेतातच खराब होण्याच्या मार्गावर आहे.
अवकाळी पावसाच्या संकटातून कशी बशी सुटका झाली असताना लॉकडाऊनमुळे पीक शेतात खराब होण्याच्या मार्गावर आहे. प्रशासनाने उपाययोजना करून शेतकऱ्यांचे हाती आलेले पीक बाजारपेठेत विकले जावे यासाठी सोय करावी, अशी विनंती शेतकऱ्याने केली आहे.