अमरावती - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षी आषाढी एकादशीला पंढरपूर येथील यात्रा रद्द करण्यात आली होती. केवळ फक्त मानाच्या पालख्यांना एसटी बसने पंढरपूरला नेण्याची परवानगी शासनाने दिली होती. यंदाही पंढरपूरची पायी वारी रद्द करण्यात आली असून केवळ मानाच्या दहा पालख्यांना एसटी बसने जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये रुक्मिणीचे माहेरघर असलेल्या कौंडण्यपूर येथील माता रुक्मिणीच्या पालखीचा देखील समावेश करण्यात आला आहे.
श्री संत सदाराम महाराज यांनी इ.स. १५९४ साली सुरू केलेली व ४२७ वर्षाची परंपरा लाभलेली विदर्भ राजकन्या म्हणून ओळख असलेली अमरावती जिल्ह्यातील कौंडण्यपूर येथील श्री रूक्मिणी मातेची प्रथम पायदळ असलेली मानाची पालखी " माहेरची पालखी " चतुर्दशीला पंढरपूरला निघत असते. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे परवानगी न मिळाल्याने पालखी निघाली नाही. केवळ पालखीत पादुका घालून मंदिराभोवती प्रदक्षिणा घालण्यात आल्या. यावर्षी देखील मागच्या वर्षीसारखीच परिस्थीती असल्यामुळे पालखीचे नियोजित प्रस्थान झाले नाही. मात्र मुहूर्त चुकू नये म्हणून प्रथम श्री रूक्मिणी मातेच्या पादुकांना संस्थानचे अध्यक्ष नामदेव अमाळकर व सचिव सदानंद साधू यांनी सपत्नीक अभिषेक केला. पालखीची आरती करण्यात आली. त्यानंतर पादुका विधीपुर्वक पालखीत घालून मंदीराला प्रदक्षिणा घालून श्री संत सदगुरू सदाराम महाराज यांच्या समाधीजवळ ठेवण्यात आली. यानंतर महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.
हेही वाचा - वर्षाच्या अखेरीस प्रधानमंत्री मोदी अमेरिकेचा दौरा करण्याची शक्यता