अमरावती - दर्यापूर तालुक्यातील कोकर्डा फाट्यापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या उमरी मंदिर या गावातील जवळपास १५० नागरिकांच्या घरातील विद्युत उपकरणे जळाल्याची घटना घडली आहे. विद्युत रोहित्रामध्ये बिघाड झाल्यामुळे गावकऱ्यांची ही उपकरणे जळाल्याची घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली. महावितरणच्या कर्मचाऱ्याच्या चुकीच्या कामामुळे नागरिकांना हा फटका बसला आहे.
उमरी गावात सुमारे पंधराशे लोकसंख्या आहे. मात्र, या नेहमीच विजेच्या पुरवठ्याबाबत त्रास सहन करावा लागत होता. या प्रकरणी गावकऱ्यांनी नागरिकांनी महावितरण कार्यालय दर्यापूर येथे गावातील मुख्य इलेक्ट्रॉनिक डीपी दुरुस्त करण्यासंदर्भात वारंवार निवेदने देऊन तक्रारी दाखल केल्या होत्या. तसेच गावात एका वायरमनची नेमणूक करण्यात यावी अशी सुद्धा मागणी करण्यात आली होती. परंतु गेल्या कित्येक वर्षांपासून या गावाला वायरमन नसल्याने गावातील नागरिकांना अंधारात राहावे लागत होते.
रोहित्रामध्ये बिघाड-
काही महिन्यांपूर्वीच अखेर गावात वायरमनची नेमणूक करण्यात आली. परंतु तो वायरमन दोन ते तीन महिने गावात हजर रहात नसल्याचा आरोपही गावकरी करीत आहेत. ग्रामस्थांच्या वाढत्या तक्रारी पाहता शुक्रवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास वायरमन गावात आला होता. त्यानंतर त्याने मुख्य डीपीवर चढून गावातील लाईट बंद करू डीपीच्या दुरुस्तीची काम केले. मात्र, त्यावेळी अर्थिंग न जोडल्याने शॉर्टसर्किटची घटना घडली, याचवेळी गावातील सुमारे शंभर ते दीडशे घरातील टीव्ही, फॅन फ्रिज, वाशिंग मशीन, झेरॉक्स प्रिंटर , आधी इलेक्ट्रॉनिक वस्तू शॉर्टसर्किटने पुर्णत नष्ट झाले. यात सुमारे अंदाजे पंधरा ते वीस लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
कारवाईचे आश्वशन-
शार्टसर्किटची ही घटना घडताच गावकऱ्यांनी डीपीजवळ गर्दी करत जोपर्यंत नुकसान भरपाई मिळणार नाही तोपर्यंत आम्ही वायरमनला गावाबाहेर जाऊ देणार नाही, असा पवित्रा घेतला. या नुकसानीला महावितरणाचा भोंगळ कारभार जबाबदार असल्याचे दिसून येत आहे. या घटनेची माहिती येवदा पोलीस स्टेशनला कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन गावातील वातावरण शांत केले. तसेच या प्रकरणी दर्यापूरचे महावितरनचे उपकार्यकारी अभियंता सी एन. मोहोकार यांनी गावकऱ्यांना चौकशीअंती कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.