अमरावती - जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील ४५ ग्रामपंचायतींपैकी ४० ग्रामपंचायत कार्यालयाने ग्रामस्थांकडे थकीत असलेले घर, पाणी कर वसुली करण्यासाठी न्यायालयामार्फत नोटीस बजावली होती. यात २९२० प्रकरणांपैकी ३२३ जणांनी तिवसा न्यायालयातील लोकअदालतमध्ये कर भरला. यामध्ये ४० ग्रामपंचायतींमध्ये केवळ १० लाख १० हजार ७७६ रुपये वसुली झाली. त्यामुळे न्यायालयाच्या नोटीसकडे इतर थकबाकीदारांनी पाठ फिरवल्याने आता त्यांच्यावर न्यायालयात खटला दाखल करण्याचा इशारा पंचायत समिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.
ग्रामीण भागात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावाचा विकास अवलंबून असतो, यात नागरिकांकडे मालमत्ता कर, पाणीपट्टी कर, सह विविध माध्यमातून कर भरावा लागतो. याच कराच्या माध्यमातून गावातील विकासकामे होत असतात. मात्र, तिवसा तालुक्यातील ४० ग्रामपंचायतीच्या २९२० लोकांनी कर न भरल्याने ग्रामपंचायतीने थेट कर वसुलीसाठी न्यायालयामार्फत नोटिस बजावली. याप्रकरणी शनिवारी तिवसा न्यायालयात लोकअदालतमध्ये सर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती.
हेही वाचा - अमरावती शहरासह जिल्ह्यात जोरदार अवकाळी पाऊस
२९२० प्रकरणापैकी ३२३ प्रकरणे निकाली निघाली, मात्र २५९७ जणांनी न्यायालयाच्या या नोटिसकडे पाठ फिरवली असल्याचे दिसून आले. तिवसा न्यायालयाचे न्यायाधिश एल.डी.कोरडे यांनी यावर निकाल दिला. यावेळी जेष्ठ वकील प्रमोद राजनेकर, वकील संघाचे अध्यक्ष प्रमोद गाडे, पंचायत समिती बिडीओ गावंडे, विस्तार अधिकारी संजय पुनसे, रामटेके आदी उपस्थित होते.
हेही वाचा - नागरिकत्व दुरुस्ती कायदा : अमरावतीमधील १६० निर्वासितांना भारतीय नागरिकत्व मिळण्याची अपेक्षा