अमरावती : लंपी प्रतिबंधासाठी गोवंशीय गुरे व म्हशी यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यास मनाई करण्यात आली होती. तथापि, आता सर्वदूर लसीकरण झाल्याने व आजाराचा प्रादुर्भाव नियंत्रणात आल्याने परवानगी देण्यात आली. ( vaccinated cattle will be transported ) त्यामुळे नियंत्रित क्षेत्रातील संक्रमित नसलेल्या जनावरांची जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर वाहतूक करता येणे शक्य झाले आहे. या वाहतुकीसाठी सक्षम प्राधिका-याचे आरोग्य प्रमाणपत्र अनिवार्य आहे.
बाजार खुले; पण शर्यतीसाठी परवानगी आवश्यक : गोजातीय प्रजातीच्या गुरे व म्हशींचा बाजार भरविण्यास परवानगी देण्यात आली आहे. तथापि, प्राण्यांच्या शर्यती आयोजित करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाची पूर्व परवानगी आवश्यक राहणार आहे.
बाधित जनावरांसाठी मनाई कायम : म्हशी वगळता अन्य बाधित असलेल्या गोजातीय प्रजातीच्या कोणत्याही जिवंत किंवा मृत गुरांच्या संपर्कात आलेली वैरण, निवा-यासाठी वापरलेले गवत, शव, कातडी, अन्य साहित्य कुठेही नेता येणार नाही. तसेच, म्हशी वगळता अन्य बाधित गुरांना बाजारात, जत्रेत, प्रदर्शनात किंवा अन्य प्राण्यांच्या कळपात आणण्यास मनाई करण्यात आली आहे. म्हशींमध्ये या आजाराचा प्रादुर्भाव न आढळल्याने म्हशींना या आदेशातून वगळण्यात आल्याचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. पुरूषोत्तम सोळंके यांनी स्पष्ट केले आहे.
लंपी त्वचा रोग काय आहे ? : लंपी हा प्राथमिकता त्वचा रोग आहे. यामध्ये केवळ गोवंश व महिष वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचा रोग आहे. हा रोग कीटकांपासून पसरत असल्याचे तज्ञ डॉक्टरांचे मत आहे. माशा आणि डासांच्या विशिष्ट प्रजाती तसेच उवांमुळे हा रोग पसरतो. यामुळे ताप येणे, त्वचेवर गाठी येणे अशी लक्षणे दिसून प्राण्याचा मृत्यू देखील होऊ शकतो. यापूर्वी कोणतेही विषाणू संसर्ग न झालेल्या प्राण्यांना याचा सर्वाधिक धोका आहे असही डॉक्टर म्हणाले आहेत.
लंपी त्वचा रोगाची लक्षणे? : लंपी त्वचा रोगाच्या लक्षणांमध्ये ताप, डोळे आणि नाकातून स्त्राव, जास्त लाळ, पशूंच्या शरीरावर फोड येणे आणि दुधाचे उत्पादन कमी होणे अशी लक्षणे दिसून येतात. तसेच, काही प्रकरणांमध्ये गुरांना खाण्यास त्रास होत असल्याचेही निदर्शनास आले आहे.
लंपी त्वचा रोग मानवांमध्ये संक्रमित होऊ शकतो का? : लंपी त्वचा रोग भारतात वेगाने पसरत असला तरी अधिकारी आणि वैद्यकीय तज्ज्ञांनी खात्री केलेली आहे. त्यामध्ये लंपी त्वचा रोग मानवामध्ये पसरत नाही. जर हा आजार झालेल्या प्राण्यांच्या संपर्कात असल्यासही मानवामध्ये हे संक्रमण होत नाही. लंपी त्वचा रोगामुळे मृत्यू दर १ ते २ टक्के आहे असही तज्ञांचे मत आहे.