अमरावती - जिल्ह्यातील चांदुर बाजार तालुक्यातील करजगावमधील सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा अजब आणि तेवढाच धक्कादायक कारनामा समोर आला आहे. एकच खाते क्रमांक हा दोन ग्राहकांना दिल्याचा धक्कादायक पराक्रम या बँकेतील महाशयानी केला आहे. परिणामी खात्यातून दोन लाख रुपये काढण्यात आल्यावर ज्या ग्राहकाने ही रक्कम काढली आता तो 'तो मी नव्हेच’ची भूमिका घेत असल्याने एकच खळबळ उडाली आहे.
चांदुर बाजार तालुक्यातील करजगाव येथील रहिवासी फिरोजा बानो सलीम शहा यांच्या 3383775016 या खाते क्रमांकामध्ये त्यांनी पै-पै गोळा करून मुलीच्या लग्नासाठी मोलमजुरी करून 17 नोव्हेंबर 2016 ला दोन लाख रुपये जमा केले होते. मुलीच्या लग्नासाठी पैसे बँकेमध्ये सुरक्षित आहेत, असे समजून त्यांनी कानाडोळा केला. लग्नाला वेळ असल्याने त्या पैशाकडे लक्षही दिले नाही. परंतु 2019 मध्ये मुलीचे लग्न जुळले आणि पैशांची गरज भासली तेव्हा फिरोजा बानो आणि त्यांचे पती जेव्हा बँकेमध्ये पैसे काढण्याकरिता गेले, तेव्हा खात्यातील सर्व पैसे काढण्यात आल्याचे कॅशियरने सांगताच त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली.
बँक अधिकाऱ्याकडून जेव्हा कळले की तुमच्या बँक खात्यामध्ये एवढे पैसेच नाही, हे ऐकल्यानंतर फिरोजा बानो आणि त्यांचे पती चकित झाले आणि त्यांच्यासमोर एकच प्रश्न समोर उभा राहिला की, खात्यातील पैसे गेले कुठे? आणि कोणी काढले? त्यांनी लगेच बँक शाखा प्रबंधकांसोबत संपर्क साधून पूर्ण माहिती घेतली तेव्हा समजले की बँकेने चुकीने त्यांचाच खाते नंबर दुसर्याही ग्राहकाला दिल्यामुळे हा सर्व प्रकार घडला. दुसर्या ग्राहकाने मात्र याचा नेमका फायदा घेऊन 2 लाख रुपये काढून घेतले आहेत.
फिरोजा बानो यांनी बँकेमध्ये तक्रार केली आणि पैसे परत मिळण्याची मागणी केली. बँकेने याकडे कानाडोळा करीत पैसे परत मिळून जाईल, असे सांगितले. बानो यांनी 20 जानेवारी 2019 ला बँकेला याची लेखी तक्रारसुद्धा केली होती. यावर बँक लवकरात लवकर दखल घेऊन पैसे परत मिळवून देईल, असे वाटत होते. मात्र, परत तक्रार करूनसुद्धा त्यावर काहीच कारवाई करण्यात आली नाही. शेवटी पुन्हा तक्रार केल्यानंतर 11 मे 2019 ला शाखा प्रबंधकांनी शिरजगाव कसबा पोलीस स्टेशनमध्ये विथड्रॉल करणार्या व्यक्तीच्या नावे तक्रार केली. त्या आधारावर आता पोलीस पुढील तपास करत आहेत.