अमरावती - मेळघाट हा राज्यातील अतिदुर्गम असा भाग असून जैव विविधतेने नटला आहे. मेळघाटची सौंदर्य सृष्टी ही कायम पर्यटकांना भुरळ घालते. त्यामुळे येथे दरवर्षी पर्यटकांचा ओढा असतो. याच मेळघाटात राहणारे आदिवासी, कोरकू लोकांच्या आगळ्यावेगळ्या संस्कृती, आदिवासी नृत्य, त्यांची भाषा यामुळे सुद्धा या मेळघाटची छाप कायम आहे. तंत्रज्ञानाचे युग आले असले, तरी मेळघाटमधील आदिवासी बांधव पूर्वी सारख्याच त्यांच्या प्रथा आजही जोपासत आहेत. त्यातील एक प्रथा म्हणजे 'ढेढरा माता पाणी दे' ही पुजा आहे. ही पुजा पावसाळ्यात केली जाते. या पूजेच्या माध्यमातून आदिवासी तरुणी एकत्र गोळा होऊन घरोघरी जात गाणे गायन करतात. त्यानंतर त्यांना गावातील लोक धान्य देतात आणि त्याचा गावातील नदीकाठी जाऊन महाप्रसाद केला जातो. यावेळी वरुण राजाला पावसासाठी साकडे घातले जाते. यामुळे पाऊस येतो, अशी भावना येथील आदिवासी लोकांमध्ये आहे.
पूजा केल्यानंतर भरघोस पाऊस येतो, अशी आख्यायिका -
पाऊस दमदार व्हावा, शेतकऱ्यांचे पीक चांगले यावे, सर्वांना सुख समृद्धी यावी, यासाठी आदिवासी बांधव आजही संस्कृती जपतात. त्यासाठी तरुणी घरोघरी जाऊन गाणे म्हणून धान्य गोळा करतात. त्यानंतर गावाच्या नदीकाठी येऊन देवाची पूजा केली जाते. त्यावर तिथे पाणी टाकले जाते. त्यानंतर मग गावात आल्यानंतर गावातील लोकही त्यांच्या अंगावर पाणी टाकतात आणि मग स्वयंपाक करून त्याचे जेवण केले जाते. ही या पूजा केल्यानंतर भरघोस पाऊस होते, अशी मेळघाटातील आदिवासी बांधवांची आख्यायिका आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून मेळघाटातील आदिवासी बांधव ही प्रथा जोपासत आहे.
काळानुसार धोंडीची प्रथा लोप पावत चालली -
पूर्वी पावसाळा सुरु होताना गावोगावी तरुणांकडून धोंडी काढली जायची. यावेळी तरुण कमरेला निंबाचा पाला आणि बेडूक बांधून आणि खांद्यावर काठी घेऊन घरासमोर नाचून 'धोंडी धोंडी पाणी दे, दाय दान पिकू दे' ही आर्जव वरुण राजाकडे केली जायची. त्यानंतर लोक त्यांना अन्नधान्य द्यायचे. धोंडी काढल्यानंतर पाणी येते, ही भावना लोकांची आहे. त्यामुळे शेतकरी धोंडीचे पूजन करतात. परंतु काळानुसार धोंडीची प्रथा लोप पावत असली, तरी मेळघाटात मात्र अशीच काहीशी प्रथा ही आहे, या प्रथेला भवई असे म्हणतात.
मेळघाटातील भवई पूजेनंतर हे 'ढेढरा पाणी दे ही' प्रथा सुरू होते -
यामध्ये आदिवासी बांधवांसह गवळी समाजाचे किशोरावस्थेतील मुले-मुली एकत्र येऊन गावात घरोघरी फिरतात. यावेळी लहान मुले कंबरीला जांभळाचे पाने बांधून व डब्यात पाण्यात बेडकाची पिल्ले घेऊन 'मिछुक दे बुलूम दे कोबळाडाळेना डा का बान ढेढरा पाणी दे', अशा पद्धतीचे आर्जव करून नृत्य करतात. तसेच गावात घरोघरी जाऊन त्याच्या अंगावर पाणी टाकले जाते.
हेही वाचा - प्रदीप शर्मा आणि सचिन वाझे हेच खरे सूत्रधार, NIA ला आधीपासून होता संशय