अमरावती - मोठ्या हॉटेलमधील चमचमीत पदार्थांवर ताव मारला तरी, पाणीपुरी खाल्ल्याशिवाय खवय्ये तृप्त होत नाहीत. मात्र, कोरोनामुळे पाणीपुरी खाताना मनात धाकधुक वाढली आहे. आता पाणीपुरीवर मनसोक्त ताव मारणाऱ्या अमरावतीकरांसाठी एक खूशखबर आहे. पाणीपुरीच्या पुरी माठात न बुडवता थेट मशिनद्वारे पाणी मिळण्याची व्यवस्था झाली आहे. शहरातील नंदूभाऊ जोशी यांनी ही व्यवस्था उपलब्ध केली आहे. त्यामुळे आता लॉकडाऊननंतर खवय्यांना मनात कुठलीही भीती न बाळगता पाणीपुरीचा मनसोक्त आस्वाद घेता येणार आहे.
शहरातील रुक्मिणीनगर परिसरात नंदूभाऊ जोशी हे पाणीपुरीसाठी प्रसिद्ध आहेत. 1993पासून त्यांचा हाच व्यवसाय आहे. नंदूभाऊंची दोन्ही मुले फोटोग्राफर आहेत. मात्र, कोरोना लॉकडाऊन काळात प्रेस फोटोग्राफर असणाऱ्या शेखर जोशी या लहान मुलाची नोकरी गेली. त्याकाळात वडिलांची पाणीपुरीची गाडीही बंद होती. तेव्हा आपल्या नियमित ग्राहकांसाठी पाणीपुरीसह भेळ घरपोच देण्याचे काम शेखर यांनी केले. आता अनलॉक होताच प्रेस फोटोग्राफीचा नाद सोडून देत शेखरने वडिलांच्या व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला. कंवरनगर परिसरात घरलागतच शेखरने पाणीपुरी आणि भेळीचा व्यवसाय सुरू केला. त्यासाठी शेखरने आजवर साठवलेल्या पैशातून व वडिलांच्या मदतीने पाणीपुरीसाठी एक मशीन खरेदी केली.
शेखरने मागवलेली पाणीपुरीची मशीन, ही अमरावतीतील अशी पहिलीच मशीन आहे. या मशीनला असलेल्या दोन कप्प्यांमध्ये तिखट आणि गोड असे दोन्ही प्रकारचे पाणी ठेवता येते. मशीनच्या समोरच्या भागाला असणाऱ्या तोट्यांसमोर पुरी नेताच सेन्सरिंगद्वारे पाणी पुरीत पडते. आता शेखर ग्राहकांसमोर केवळ चणे भरलेली पुरी ठेवतो आणि ज्यांना जसे पाणी हवे तसे पाणी ग्राहक मशिनद्वारे पुरीत भरून पाणीपुरीचा आस्वाद घेतात. कंवरनगर चौकात असणारी ही पाणीपुरी मशीन शहरभर चर्चेचा आणि कुतुहलाचा विषय ठरली आहे. पाणीपुरीचे शौकीन याठिकाणी पाणीपुरीचा आस्वाद घेण्यासाठी आवर्जुन येत आहेत.