अमरावती - एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी बांधण्यात आलेला प्रवासी निवारा घोड्यांचा तबेला झाल्याचे चित्र नांदगाव खंडेश्वर येथे दिसत आहे. बस स्थानकाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत अल्यामुळे प्रवासी बाहेर आणि घोडे प्रवासी निवाऱ्याच्या आत आसरा घेत आहेत.
लॉकडाऊनच्या काळात सर्व शासकीय निमशासकीय स्तरावरील प्रवासी वाहतूक प्रशासनाने बंद केली होती. आता हळूहळू लॉकडाऊन शिथिल केले आहे. शासनाने पुन्हा परिवहन महामंडळाची प्रवासी वाहतूक सुरू केली आहे. आता प्रवासी जिल्हा अंतर्गत व जिल्हा बाह्यसुद्धा प्रवास करू शकतात. नांदगाव खंडेश्वर येथील बस स्थानकात घोडे बांधले जात असल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.
स्वतः परिवहन महामंडळाचे कर्मचारी बस स्थानक परिसरात कार्यरत असूनही ते या प्रकाराकडे डोळे झाक करत आहेत. प्रवासी निवासाच्या आत घोडे बांधले जात असल्याने प्रवाशांना नाईलाजाने बस स्थानकाच्या बाहेरच उभे रहावे लागत आहे. यामुळे एकाच ठिकाणी प्रवाशांची गर्दी होत असून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.