अमरावती - छत्री तलाव ते एक्सप्रेस हाय-वेच्यामध्ये असणाऱ्या मोकळ्या परिसरात एका व्यक्तीची सिमेंटच्या विटेने ठेचून हत्त्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. अशोक सरदार (34) असे मृतकाचे नाव असून या घटनेमुळे छत्रीतलाव परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी अतुल तुपाटे (32) आणि राजेश थोरात (33) या दोघांना अटक केली आहे. अवघ्या पाच दिवसाच्या अंतराने एक्सप्रेस हायवे लागत हत्त्येची दुसरी घटना घडक्याने शहर हादरले आहे.
छत्री तलाव परिसरात होती पार्टी -
छत्री तलाव परिसरात विनायक विद्यालयाच्या मागे वडाच्या झाडाखाली लगतच्या जेवड नगर परिसरातील युवकांची आज अंडे पार्टी होती. मृतक अशोक सरदार, प्रशिक गडलिंग आणि सचिन मरसकोल्हे या तिघांनी छत्री तलाव लगतच्या बगीचा परिसरात दारू प्राशन केली आणि पार्टीच्या स्थळी पोचले. याठिकाणी अतुल तुपाटे आणि राजेश थोरात हे दोघे आधीच हजर होते. पार्टीत जेवण करण्यासाठी अशोक सदार, प्रशिक गडलिंग आणि सचिन मरसकोल्हे हे एकाच दुचाकीने पार्टीस्थळी आले. याठिकाणी पार्टीनिमित्त आधीच हजर असणाऱ्या अतुल तुपाटेला पाहून अशोक चिडला होता. काही महिन्यांपूर्वी अशोक सरदार याने अतुल तुपाटेच्या डोक्यात दगड मारला होता. यामुळे अतुलचे डोके फुटले होते. या प्रकरणाची तक्रार पोलिसांत दिली नव्हती. तेव्हापासून अशोकने त्याला मारले म्हणून चिडवायाचा. आज दोघेही पुन्हा समोरासमोर आले, तेव्हा त्या दोघांसह घटनास्थळी हजर सर्व दारूच्या नशेत होते. अशोकाने अतुलची छेद काढताच अतुल आणि राजेश थोरात या दोघांनी अशोकला मारहाण केली. या झटापटीत अशोक खाली पोटावर पडला असताना अतुलने बाजूला असणारी सिमेंटची वीट उचलून अशोकच्या डोक्यात मारली. यामुळे अशोकचा जागीच मृत्यू झाला.
पोलिसांनी केली दोघांना अटक -
अशोक सरदार, अतुल तुपाटे आणि राजेश थोरात यांच्यात वाद सुरू असताना अतुलने अशोकची हत्त्या करताच हा संपूर्ण प्रकार डोळ्यादेखत पाहणारे प्रशिक गडलिंग आणि सचिन मरसकोल्हे या दोघांनी घटनास्थळावरून पळ काढून जेवड नगर गाठले. तसेच झालेल्या प्रकारची माहिती त्यांनी अशोक कुटुंबियांना दिली. त्यानंतर अशोकच्या कुटुंबियांनी घटनास्थळ गाठत याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी आरोपी अतुल तुपाटे आणि राजेश थोरात यांना त्यांच्या घरातूनच अटक केली.
घटनास्थळी आक्रोश -
घटनेची माहिती मिळताच अशोक सरदार याच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी राजापेठ पोलिसांचा ताफही घटनास्थळी पोचला होता. डोके ठेवलेल्या अवस्थेत अशोक सरदारचा मृतदेह पाहून त्याच्या कुटुंबतील सदस्यांनी आक्रोश केला.
मृतक अशोक सरदार होता तडीपार -
मृतक अशोक सरदार हा तडीपार आरोपी होता. 2011 पासून त्याच्यावर घरफोडी, दरोडे, चोरी , धमकावणे अशा विविध स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल होते. 2017-18 मध्ये त्याला पहिल्यांदा तडीपार करण्यात आले होते. आता सुद्धा तो तडीपार होता.
पाच दिवसांपूर्वीही युवकाची झाली होती हत्या -
रविवारी 30 मे रोजी शहरातील एक्सप्रेस हायवेवर वडद शेतशिवर परिसरात बच्चू वानखडे या युवकाच्या पोटात चाकूचे 43 वार करून हत्या करण्यात आली होती. हत्या करून त्याचा मृतदेह पेरविण्यात आला होता. ही घटना ताजी असताना आज पुन्हा ही नवी घटना घडल्याने शहर हादरले आहे.