अमरावती - खासदार नवनीत राणा यांनी आज सकाळी त्यांचे पती आणि बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांचे वाढलेले केस कापून दिले. केस कापतानाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरला झाला आहे. यात खासदार आमदारांचे केस कापून देत आहेत. एक्सपर्ट नसले तरी हा माझा प्रयत्न असल्याचे या व्हिडिओमध्ये नवनीत राणा म्हणाल्या आहेत.
कोरोना लॉकडाऊनमुळे अमरावती शहरातील सर्व सलून बंद आहेत. यामुळे आमदार रवी राणा यांची दाढी आणि केस भरपूर वाढले आहेत. रवी राणा यांना केस कापण्याबाबत वारंवार सांगूनही ते लक्ष देत नाहीत. आमदार म्हणून रवी राणा यांना रोज अनेक बैठकांना जावे लागते. त्यामुळे डोक्यावर इतके वाढलेले केस चांगले दिसत नाहीत. त्यामुळे आज मीच त्यांची कटिंग करून देण्याचे ठरवले आहे, असे नवनीत राणा म्हणाल्या.
आमदार-खासदार असलेले राणा दाम्पत्य नेहमी आपल्या समाज कार्यांमुळे आणि जनतेच्या कार्यक्रमांमध्ये उत्स्फुर्त सहभाग घेण्यामुळे चर्चेत असतात. काही महिन्यांपूर्वी एका आदिवासी कार्यक्रमामध्ये आमदार रवी राणा यांनी वाजवलेल्या ढोलच्या तालावर खासदार नवनीत राणा यांनी ठेका धरला होता.