अमरावती - देशभरात आज योगदिवस साजरा केला जात आहे. योग शिकण्यासाठी अनेकजण शिकवणी वर्ग लावतात. अनेकांनी रामदेव बाबांना आपला योगगुरू मानले. मात्र, जिल्ह्यातील शिरजगावामध्ये दोन मुलांसाठी त्यांची आईच त्यांचा योगगुरू बनली आहे. पाहूया यासंदर्भातील ईटीव्ही भारतचा स्पेशल रिपोर्ट...
रीना प्रवीण डांगोरे, असे योगगुरू मातेचे नाव आहे. त्या गृहिणी म्हणून घरातील सर्वच कामे करतात. अगदी दावणीला बांधलेल्या गाईच्या चाऱ्यापासून तर मुलांचा अभ्यास घेण्यापर्यंत सर्वच कामे करीत असतात. त्यांना दोन लहान मुले आहेत. सध्या ते प्राथमिक शिक्षण घेतात. या मुलांचा अभ्यास घेतानाच आपली मुले निरोगी राहावी. यासाठी त्यांनी लहानपणापासूनच मुलांकडून योग करून घ्यायला सुरुवात केली. त्या दररोज सकाळी आपल्या दोन्ही मुलांकडून योग करून घेतात.
रिना यांच्या योगाभ्यासामुळे आज मुलेही चांगल्या पद्धतीने योग करतात. एवढेच नाहीतर रिना मुलांना योग शिकवत असतात त्यावेळी परिसरातील लहान मुलेही येऊन बसतात आणि त्यांच्यासारखाच योग करण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या एका मुलाने योगाभ्यासामध्ये प्राविण्य मिळवले आहे. यासाठी त्याला अनेकदा गौरवण्यात देखील आले आहे.