अमरावती: अरबी समुद्रावरून केरळ मार्गे मुंबईला 7 जून पर्यंत मान्सून दाखल होतो. यानंतर तीन ते चार दिवसात विदर्भात मान्सूनचे आगमन होत असते. मान्सूनचे पश्चिम आणि पूर्व अशा दोन शाखा आहेत. पश्चिमेकडील शाखेत अरबी समुद्राची शाखा तर पूर्वेकडे बंगालच्या समुद्राची शाखा आहे. यावर्षी बिपरजॉयमुळे अरबी समुद्रात चक्राकार वारे वाहत नाही आहेत. तसेच कमी दाबाचा पट्टा देखील नाही. याउलट बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्यामुळे मान्सूनला गती मिळाल्याने मान्सून बिहारपर्यंत पुढे गेला आहे. बंगालच्या उपसागरातील मान्सूनची एक शाखा शुक्रवारी पूर्व विदर्भात पोहोचली. यामुळे मुंबईच्या पूर्वी विदर्भात मान्सूनचा पाऊस कोसळत असल्याचे श्री शिवाजी कृषी महाविद्यालयातील हवामान विभाग प्रमुख प्रा. अनिल बंड यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.
2019 मध्ये पण अशीच परिस्थिती: अमरावतीसह संपूर्ण विदर्भात मुंबई मागेच मान्सून येतो. मात्र यापूर्वी देखील 2019 मध्ये बंगालच्या उपसागरातूनच मान्सून विदर्भात आला होता. यावर्षी बंगालच्या उपसागरावरून आंध्रप्रदेध, ओरिसमार्गे मान्सून पूर्व विदर्भात दाखल झाला. सध्या चंद्रपूर आणि गाडचिरोली तालुका मान्सूनने व्यापला आहे. येते दोन तीन दिवसात विदर्भातील सर्व जिल्हे आणि मध्यप्रदेशला मान्सून गाठणार असे प्रा. अनिल बंड म्हणाले.
विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज: विदर्भात मान्सून व्यापला जात असताना शनिवारी अनेक भागात पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी बरसतील. 25 ते 27 जूनला विदर्भात सर्व भागात मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे प्रा. अनिल बंड यांनी स्पष्ट केले.
दक्षिण महाराष्ट्रात पावसाची हजेरी: दक्षिण महाराष्ट्रात पावसाने हजेरी लावली आहे. ८ जून रोजी केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसांनतर महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला आहे. महाराष्ट्रातील रत्नागिरीमध्ये मान्सून पोहोचला आहे. भारतीय हवामान विभागाकडून ही माहिती देण्यात आली आहे. दरवर्षीच्या तुलनेत मान्सून यंदा चार ते पाच दिवस उशिरा आलेला आहे.
बिपरजॉय वादळामुळे मान्सून उशिरा: महाराष्ट्रातील शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक मान्सून कधी दाखल होणार याची वाट पाहत होते. अखेर राज्यात मान्सूनचे आगमन झाले आहे. महाराष्ट्रात आज म्हणजे ११ जून रोजी मान्सून दाखल झाला आहे. महाराष्ट्रात रत्नागिरीपर्यंत मान्सून पोहोचला आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या बिपरजॉय वादळामुळे मान्सूनच्या आगमनाला उशीर झाला होता. केरळमध्ये मान्सून १ जूनला दाखल होतो. त्यानंतर मान्सून ७ जूनपर्यंत दाखल होतो. दरवर्षीच्या तुलनेत यंदा अरबी समुद्रात निर्माण झालेल्या बिपरजॉय वादळामुळे मान्सूनचे आगमन उशिराने झाले.