अमरावती - प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम संपल्यानंतर अकरावीत शिकणारी एक विद्यार्थिनी घरी जात होती. यावेळी तिच्या ओळखीमधील दोन युवकांनी जबरदस्तीने दुचाकीवर बसवले. यानंतर नराधमांनी तिला एका घरात नेऊन मद्य पाजले; आणि तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात दोन्ही युवकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, फ्रेजरपुरा पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
शुभम सुनिल महल्ले (वय-20) आणि कुंदन हरिश्चंद्र शिरखरे (वय-29) अशी आरोपींची नावे आहेत. प्रजासत्ताकदिनाच्या कार्यक्रमानंतर सकाळी साडेअकराच्या सुमारास अकरावीत शिकणारी विद्यार्थिनी घराकडे परतत होती. यावेळी शुभम आणि कुंदन यांनी तिला जबरदस्तीने दुचाकीवर बसवले. यानंतर त्यांनी पीडितेला एका घरात नेऊन बळजबरीने दारू पाजली. यानंतर दोघांनीही तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला. तसेच याबद्दल कोणाकडेही वाच्यता केल्यास वाईट परिणाम होतील, अशी धमकी देखील दिली. काही वेळानंतर दुपारी दोनच्या सुमारास दोघांनी पीडितेला तिच्या घरापासून काही अंतरावर सोडून पळ काढला.
या घटनेनंतर घाबरलेल्या युवतीने संबंधित प्रकाराची माहिती मोठ्या बहिणीला दिली. यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी शुभम महल्ले या युवकास अटक करण्यात आली असून कुंदन शिरखरे फरार आहे. शुभमला न्यायालयासमोर हजर केल्यानंतर त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तसेच घटनेचा अधिक तपास पोलीस अधिकारी ज्योती बळेगावे करत आहेत.