अमरावती - जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्याच्या भुईखेड येथील कर्जबाजारी शेतकरी शशिकांत मानकर यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडिओ बनवून कर्जामुळे पर्याय उरला नाही, असे म्हणत विष घेऊन २७ मे रोजी आत्महत्या केली होती. त्यांच्या या व्हिडिओ व आत्महत्येमुळे संपूर्ण जिल्हाभर खळबळ उडाली.
त्याबाबत येवदा पोलिसांनी आत्मघाती मृत्यूची नोंद करून तपास आरंभला होता. परंतु, शशिकांत यांनी सावकाराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली, असा आरोप कुटुंबाने केला होता व आत्महत्येला सावकारच जबाबदार असल्याचे म्हटले होते. मृत शेतकऱ्याच्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी भेट दिली. त्यानंतर आता या सावकारावर आत्महत्या करण्याला जबाबदार धरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
म्हैस अकोला येथील रहिवासी नरेंद्र गुणवंत देशमुख याने भानुदास पवार व किशोर देशमुख राहणार दोघेही म्हैसांग यांच्या मार्फत शशिकांत मानकर यांनी २१ लाख नव्वद हजार रुपये ३ टक्के दाराने टप्प्या टप्प्याने व्याजाने घेतले होते. त्या बदल्यात शशिकांत यांनी आपले साडेपाच एकर शेती नामधारी खरेदी करून दिले होते. वरील रक्कम परत करूनही नरेंद्र देशमुख शशिकांत यांना शेत पलटी करून देत नव्हते. तसेच वारंवार शेत विकण्याच्या धमक्या देत असत अशी तक्रार शशिकांत यांची पत्नी उज्वला मानकर यांनी येवदा पोलिसात दिली. त्यानंतर येवदा पोलिसांनी सदर आत्महत्येला जबाबदार म्हणून नरेंद्र देशमुख, भानुदास पवार व किशोर देशमुख या तिघांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले. अतिशय दुर्दैवी अशा या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सदर कुटुंबाला भेट देऊन परिवाराचे सांत्वन करून त्यांना न्याय मिळवून देण्यात येईल, असे आश्वासन दिले.