अमरावती - जिल्ह्यात असणाऱ्या विधानसभेच्या आठ मतदारसंघांपैकी बडनेरा मतदारसंघ हा सगळ्यात आगळावेगळा मतदारसंघ आहे. बडनेरा मतदारसंघाचा सुमारे 70 टक्के मतदार हा शहरी भागातील रहिवासी असून तीस टक्के मतदार हा ग्रामीण भागात आहे. एकूण शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही संस्कृती, दोन्ही ठिकाणच्या समस्या, अडचणी आणि दोन्ही भागांचा समान विकास अशा विविध आव्हानांचा सामना करायला लावणारा हा मतदारसंघ आहे. 2009 च्या निवडणुकीत चमत्कारिक विजय मिळवल्यावर अपक्ष आमदार रवी राणा या मतदारसंघाचे नेतृत्व करत आहेत. सलग दोनवेळा बडनेरा मतदारसंघातील मतदारांनी रवी राणा यांना मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत आमदार रवी राणा यांच्या पत्नी नवनीत राणा या जिल्ह्याच्या खासदार म्हणून त्यांच्यासोबत आहेत. खासदारसोबत असल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास गेल्या दोन निवडणुकांच्या तुलनेत निश्चितच वाढला आहे. अशा परिस्थितीत आमदार राणा यांच्याविरोधात भाजप आणि शिवसेनेतील अनेकांनी कंबर कसली आहे. आमदार राणांविरोधात गेल्या दीड ते दोन वर्षांपासून भाजप आणि शिवसेनेचे इच्छुक उमेदवार दणकावून कामाला लागले आहेत. लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांचा विजय झाला असला तरी बडनेरा मतदारसंघात मात्र नवनीत राणा यांना माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्यापेक्षा दहा हजाराच्या जवळपास कमी मते मिळाल्याने बडनेरा मतदारसंघात यावेळी आमदार राणा यांची जादू चालणार नाही, अशी अपेक्षा आमदार राणा यांच्या विरोधकांना आहे. यामुळेच 2019 च्या विधानसभा निवडणुकीत बडनेरा मतदारसंघात आमदार रवी राणा विजयाची हॅट्रिक साधतात की मतदार त्यांच्या विरोधकांना संधी देतात अशी रंगतदार निवडणूक बडनेरा मतदारसंघात यावेळी पाहायला मिळणार आहे.
हेही वाचा - आखाडा विधानसभेचा : अकोल्यात पिचडांना कोण देणार टक्कर?
बडनेरा मतदारसंघ शिवसेनेचा गड मानला जायचा. 2004च्या निवडणुकीत पहिल्यांदा सुलभा खोडके यांनी बडनेरा मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवला. 2009च्या निवडणुकीत मात्र बडनेरा मतदारसंघाची फेररचना करण्यात आली. नांदगाव खंडेश्वर तालुका धामणगाव रेल्वे मतदारसंघात समाविष्ट करण्यात आला, तर अमरावती शहरातील राधानगर, गाडगेनगर आणि विदर्भ महाविद्यालय परिसर हा बडनेरा मतदारसंघातून अमरावती मतदारसंघात समाविष्ट केला गेला. यासोबतच वलगाव मतदारसंघ संपुष्टात येऊन वलगाव मतदारसंघात येणारा भाग हा बडनेरा आणि तिवसा मतदारसंघात विभागण्यात आला. 2004 ते 2009 पर्यंत आमदार म्हणून सुलभा खोडके यांचा झंझावात बडनेरा मतदारसंघात सतत पाहायला मिळाला. सुलभा खोडके पुन्हा एकदा बडनेरा मतदारसंघातून विजयी होणार अशी अपेक्षा असताना रवी राणा यांची राजकारणात अचानक एंट्री झाली. अवघ्या काही महिन्यात रवी राणा यांनी बडनेरा मतदारसंघ पिंजून काढला. 2009च्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून रवी राणा निवडणूक रिंगणात उतरले आणि धक्कादायक विजय त्यांनी मिळवला.
आमदार राणा यांच्या विजयामुळे बडनेरा मतदारसंघाचे चित्र राजकीय दृष्ट्या पालटायला लागले. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत रवी राणा यांच्या पत्नी नवनीत राणा यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली. यामुळे रवी राणा यांच्या कट्टर विरोधक सुलभा खोडके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन 2014 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार म्हणून रवी राणा यांच्याविरोधात उभ्या ठाकल्या. 2014 च्या निवडणुकीत पहिल्यांदा भाजप आणि शिवसेनेची युती तुटली. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत आमदार रवी राणा यांच्या पत्नी नवनीत राणा यांचा पराभव करून आनंद अडसूळ यांनी मोठा विजय मिळवला होता. त्यावेळी आनंदराव अडसूळ यांना बडनेरा मतदारसंघातून तब्बल 51 हजारांचे मताधिक्य मिळाले होते. यामुळेच बडनेरा मतदारसंघात पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा फडकेल या आशेने माजी आमदार दिवंगत संजय बंड यांनी 2009 च्या निवडणुकीत तिवसा मतदारसंघात यशोमती ठाकूर यांच्याविरोधात पराभव पत्कारल्यावर 2014 ची निवडणूक बडनेरा मतदारसंघातून लढण्याचा निर्णय घेतला. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत ज्याप्रमाणे खोडके आणि राणा समर्थकांमध्ये हाणामारी, जाळपोळ अशा घटना घडल्या तसा प्रकार मात्र 2014 च्या निवडणुकीत कुठेही घडला नाही.
हेही वाचा - गडचिरोली विधानसभा आढावा: भाजप गड राखणार की काँग्रेसला मिळणार गतवैभव?
2014 च्या निवडणुकीत सुलभा खोडके, संजय बंड हे दोन माजी आमदार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचंड लाट असताना भाजपचे तुषार भारतीय यांचे तगडे आव्हान आमदार रवी राणा यांच्यासमोर होते. असे असताना आमदार रवी राणा यांनी बडनेरा मतदारसंघात पुन्हा एकदा बाजी मरली. रवी राणा यांना 46 हजार 827 मते मिळाली होती. रवी राणा यांनी संजय बंड यांचा 7 हजार 419 मतांनी पराभव केला होता. संजय बंड यांना 39 हजार 408 मते मिळाली होती, सुलभा खोडके यांना 33 हजार 897 मते मिळाली तर भाजपच्या तुषार भारतीयांना 12 हजार 663 मते मिळाली होती.
2019 ची विधानसभा निवडणुकाही बडनेरा मतदारसंघात पुन्हा रंगतदार होण्याची चिन्ह आहेत. आता रवी राणा यांच्या पत्नी नवनीत राणा या जिल्ह्याच्या खासदार असल्यामुळे आमदार रवी राणा यांचे वजन पूर्वीपेक्षा निश्चितच अधिक वाढले आहे. असे असले तरी बडनेरा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांच्यापेक्षा आनंद अडसूळ यांना दहा हजाराचे मताधिक्य असल्याने शिवसेनेला बडनेरा मतदारसंघात भगवा फडकेल, अशी आशा आहे. माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचे कट्टर समर्थक आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुनील खराटे हे गेल्या चार वर्षापासून बडनेरा मतदारसंघात निवडणूक लढण्याची तयारी करत आहेत. त्यांनी बडनेरा मतदारसंघात शिवसेनेचे चांगल्यापैकी नेटवर्कही तयार केले आहे.
हेही वाचा - आढावा उस्मानाबाद विधानसभेचा : राजेनिंबाळकरांना थोपवण्यासाठी पाटील जाणार भाजपत?
मध्यंतरी शिवसेनेचे शहर अध्यक्ष नगरसेवक प्रशांत वानखेडे हेसुद्धा बडनेरा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक होते. त्यांनीदेखील बडनेरा मतदारसंघात आपला जनसंपर्क वाढवला होता. मात्र, सध्या त्यांचे नाव गेल्या वर्षभरापासून चर्चेत नाही. माजी आमदार दिवंगत संजय बंड यांच्या पत्नी प्रिती बंड या मात्र गेल्या काही महिन्यांपासून बडनेरा मतदारसंघात सक्रिय झाल्या आहेत. लोकसभा निवडणुकीदरम्यान अमरावतीच्या नेहरू मैदान येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेत पहिल्यांदा पक्षाच्या सभा मंचावर प्रिती बंड या सार्वजनिकरित्या समोर आल्यात. सध्या प्रिती बंड यांनी बडनेरा मतदारसंघ पिंजून काढण्याचा सपाटा सुरू केला आहे. असे असले तरी आपल्याला उमेदवारी मिळणार की नाही ही या बाबत प्रीती बँड यांना शंका वाटत असल्याने त्यांनी निवडणुकीसंदर्भात किंवा आपल्या उमेदवारी संदर्भात कुठलेही भाष्य करण्याचे मात्र सध्या तरी त्या टाळत आहेत.
हेही वाचा - संगमनेर विधानसभा आढावा: विखे पाटील पाडणार थोरातांच्या बालेकिल्ल्याला खिंडार?
2014 साली भाजप आणि शिवसेनेची युती झाली नाही त्याप्रमाणेच यावेळीही युती होण्याची शक्यता कमी असल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांनीही बडनेरा मतदारसंघात पक्षाची बांधणी मोठ्या प्रमाणात केली आहे. गेल्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार असणारे नगरसेवक तुषार भारतीय यांनी बडनेरा मतदारसंघात आपण मुख्यमंत्र्यांकडून मोठ्या प्रमाणात निधी आणून विकास कामे केली असा दावा केला आहे. यावेळी आमदार रवी राणा यांचा आपण निश्चित पराभव करू असा विश्वासही तुषार भारतीय यांना आहे.
तुषार भारतीय यांच्याप्रमाणेच भाजपचे प्रदेश प्रवक्ता शिवराय कुलकर्णी यांनीही बडनेरा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी असा दावा केला आहे. बडनेरा जूनीवस्ती परिसरातील मूळचे रहिवासी असणाऱ्या शिवराय कुळकर्णी यांनी डनेरा येथील समस्या अडचणी यांची आपणास अधिक माहिती असून गेल्या तीन वर्षापासून बडनेरा मतदारसंघातील प्रत्येक गाव पिंजून काढण्याचा सपाटा शिवराय कुळकर्णी यांनी लावला आहे. तुषार भारतीय आणि शिवराय कुळकर्णी यांच्यासोबतच भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य किरण पातुरकर आणि भाजपचे शहराध्यक्ष आणि बडनेरा जूनीवस्ती परिसरातील रहिवासी जयंत डेहणकर यांनीही ही पक्षाकडे आपणास उमेदवारी मिळावी अशी मागणी केली आहे.
आमदार रवी राणा यांचा पराभव आपणच करू शकतो असा दावा करीत शिवसेना आणि भाजपातील इच्छुक उमेदवारांमध्ये सुरू असणारी रस्सीखेच हीच सध्या चर्चेचा विषय बडनेरा मतदार संघात आहे .अमरावती जिल्ह्यात आठही विधानसभा मतदारसंघांपैकी बडनेरा मतदारसंघ हा सर्वाधिक चर्चेचा मतदारसंघ निवडणुकीदरम्यान असतो. यावेळी निवडणुकीपूर्वीच बडनेरा मतदारसंघात आमदार रवी राणा यांच्या विरोधात उमेदवार कोण असेल या चर्चांना उधाण आले आहे. शिवसेनेत बंड समर्थक आणि सुनील खराटे यांच्यात उमेदवारीसाठी स्पर्धा रंगली असतानाच भाजपमध्ये देखील उमेदवारीसाठी चांगलीच रस्सीखेच सुरू आहे.
आमदार रवी राणा यांच्याकडून गेल्या दोन निवडणुकीत पराभूत झालेल्या सुलभा खोडके यांनी बडनेरा मतदारसंघाचा नाद सोडला आहे. मतदारसंघाच्या पुनर्रचनेत अमरावती शहरातील राधानगर, गाडगेनगर आणि विदर्भ महाविद्यालय परिसर हा आपल्या हक्काच्या मतदारांचा भाग अमरावती मतदारसंघात गेल्यामुळे सुलभा खोडके यांचा इंटरेस्ट अमरावती मतदारसंघात अधिक आहे. यामुळे आता बडनेरा मतदारसंघात काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचा कोण उमेदवार राहील हे अद्याप स्पष्ट झाले नाही. माजी महापौर आणि काँग्रेसचे नगरसेवक विलास इंगोले हे मात्र वर्षभरापासून बडनेरा मतदारसंघात जनसंपर्क वाढवण्यात व्यस्त आहेत. बडनेरा मतदारसंघ काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस यापैकी कोणतेही पक्षासाठी सुटला तरी दोन्ही काँग्रेसकडे उमेदवारी मागण्याची तयारी विलास इंगोले यांची असल्याचे बोलले जात आहे. बसपाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि नगरसेवक चेतन पवार हेसुद्धा बडनेरा मतदार संघात निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. मध्यंतरी चेतन पवार यांनीही बडनेरा मतदारसंघात जनसंपर्क वाढविला होता. एकूणच बडनेरा मतदारसंघात उमेदवारीसाठी दावा करणारे सर्वच आपापल्यापरीने दिग्गज आहेत. एकूण निवडणुकीच्या रणधुमाळीत आमदार रवी राणा यांच्यासमोर नेमक्या कोणत्या उमेदवाराचे आव्हान राहील हे मात्र अद्यापही स्पष्ट नाही.
बडनेरा मतदारसंघात 70 टक्के मतदार हा अमरावती आणि बडनेरा शहरातला आहे. तर, 30 टक्के मतदार हा बडनेरा लगतच्या 104 गावामधला ग्रामीण मतदार आहे. तीन लाख 48 हजार मतदार असणाऱ्या बडनेरा मतदारसंघात 2019 चा कौल आमदार रवी राणा यांना हॅट्रिक साधनाच्या बाजूने मिळतो की बडनेरा धक्कादायक परिवर्तन घडवून आणतो याबाबतची निवडणूक रणधुमाळीनंतरच स्पष्ट होईल.