अमरावती Method of Fishing in Melghat : मेळघाटातून वाहणाऱ्या अनेक नद्यांमध्ये आदिवासी महिला दगड रचून नदीचा प्रवाह अडविण्याचा प्रयत्न करताना दिसतात. नदीकाठची माती नदीत नेऊन रचलेल्या दगडांवरील फटी या महिला सतत बुजवण्याचा प्रयत्न करतात. या सर्व प्रयत्नातून नदीत एक छोटेसं धरण तयार होतं. या छोट्याशा धरणातून 'काकू'ला पकडलं जातं. मेळघाटातील कोरकू जमातीमध्ये मासोळीला 'काकू' असं म्हणतात. या 'काकू'ला नदीतून पकडण्यासाठी एकूण तीन प्रकार आहेत. त्यापैकी नदीत असे छोटे धरण तयार करुन काकूला पकडण्याचा प्रकार सर्वच भागात मोठ्या प्रमाणात आढळतो.
छोट्या धरणात कशी करतात मासेमारी : मेळघाटात पावसाळ्यात नद्या अगदी ओसंडून वाहतात. मात्र, पावसाळ्यानंतर ऑक्टोबर ते फेब्रुवारी मार्च महिन्यापर्यंत नदीचं पात्र फार कमी होऊन ही नदी वाहत जाते. नदीच्या ह्या वाहत्या पाण्याला एका बाजूनं दगड लावून आणि माती लावून हे पाणी एका ठिकाणी अडविलं जातं. ज्या ठिकाणी पाणी अडवल्यामुळं ज्याठिकाणी ते तुंबते. त्या ठिकाणचं पाणी एका भांड्याद्वारे काढून त्या ठिकाणातून पुन्हा नदीत फेकतात. त्या छोट्या धरणातील पाणी काढून टाकल्यावर त्या भागात नदीच्या प्रवाहात आलेल्या मासोळ्या या मासेमारी करणाऱ्या महिलांना गवसतात. दिवसभरात पाच ते सहा तास अशी मेहनत केल्यावर प्रत्येकी तीन-चारशे रुपये मिळतील इतक्या मासोळ्या तरी या महिला पकडतात.
कुकरी लावूनही करतात मासेमारी : नदीमध्ये बांबूच्या बारीक कमच्यांपासून गोल तांबट आकारात विणलेली कुकरी नदीच्या प्रवाहात लावून त्यात मासे पकडण्याचा प्रकारदेखील मेळघाटात पाहायला मिळतो. पावसाळ्यात नद्या ओसांडून वाहत असताना कुकरीचा वापर करुन मोठ्या प्रमाणात मासेमारी केली जाते. मेळघाटातील महिला नदीच्या पाण्याचा प्रवाह कमी झाल्यावर 'बोंबुच' या प्रकाराद्वारेही मासेमारी करतात. एका छोट्या भांड्यात खेकडा ठेवला जातो. भांड्यात खेकडा ठेवल्यावर हे भांडे कपड्यानं बांधलं जातं. बांधलेल्या कपड्याच्या वरच्या भागावर एक छोटंसं छिद्र या महिला करतात. त्यानंतर हे बोंबुच नदीच्या पात्रात थोडा खड्डा करू ठेवलं जातं. थोड्या वेळात या 'बोंबुच'मध्ये मासोळ्या हळूहळू शिरायला लागतात. दीड दोन तासात या 'बोंबुज'मध्ये बऱ्यापैकी मासोळ्या अडकतात.
बाजारात 120 रुपयांचा असतो बाटा : नदीच्या प्रवाहात वेगवेगळ्या पद्धतीनं पकडण्यात आलेल्या या छोट्या मासोळ्या आदिवासी बांधव घरी भाजून खातात. तसंच भाजलेल्या मासोळ्यांचा पावभाराचा बाटा अर्थात छोट्या मासोळ्यांची पावभाजी बाजारात 120 रुपयाला विकली जाते. मेळघाटात सीमाडोह, हरीसाल, धारणी, चिखलदरा या ठिकाणी नियमित भरणाऱ्या बाजारात मासोळीचा बाटा हमखास मिळतो. यासह दुर्गम भागातील गावांमध्ये भरणाऱ्या आठवडी बाजारातदेखील या छोट्या मासोळ्यांची विक्री होते.
हेही वाचा :