अमरावती - आठ दिवसांपूर्वी कौटुंबिक कलहातून एका व्यक्तीने कुटूंबातील पाच जणांची निर्दयी हत्या करून स्वत: आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नागपूर शहरात उघडकीस आली होती. ही घटना ताजी असतानाच अशीच धक्कादायक घटना अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील भामोद समोर आली आहे. आपल्या १६ वर्षीय मुलीची व ४० वर्षीय पत्नीची हत्या करुन पतीनेदेखील गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी रात्री उघडकीस आली आहे. तीन दिवसांपूर्वी थरारक हत्याकांड घडले असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. तर तिनही मृतदेह हे कुजलेल्या अवस्थेत आढळल्याने परिसरात दुर्गंधी पसरली होती.
पलंगाखाली आढळला पत्नीचा मृतदेह -
मिळालेल्या माहितीनुसार, भामोद येथील रहिवासी अनिल देशमुख वय (४५) यांनी आपली पत्नी व मुलीची हत्या करून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. मागील अनेक दिवसांपासून अनिल देशमुख यांचे कौटुंबिक वाद सुरू होते. शुक्रवारी परिसरातील नागरिकांना प्रचंड दुर्गंधी येत होती. यावरून काहीतरी गंभीर घटना घडल्याचा अंदाज नागरिकांनी आला आणि त्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी अनिल देशमुख यांच्या घरी पाहणी केली असता पलंगाखाली १६ वर्षीय मुलगी साक्षी अनिल देशमुख हिचा मृतदेह आढळून आला. घटनेचा पंचनामा करत असताना पोलिसांना घरातील एका कपाटाजवळ मोठ्या प्रमाणात माशा लागलेल्या दिसल्या. त्यानंतर अधिक जवळ गेले असता मोठ्या प्रमाणात दुर्गंध आल्याने पोलिसांचा संशय बळावला. कपाट उघडले असता त्यातून देशमुख यांची पत्नी वंदना देशमुख (४०) यांचा मृतदेह आढळून आला. याचवेळी घरातील मागच्या एका खोलीत अनिल देशमुख यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
हेही वाचा - Aamir Kiran Divorce : १५ वर्षांचे सहजीवन संपले, आमिर खान आणि किरण राव यांचा घटस्फोट
कौटुंबिक वादातून हत्याकांड -
याबाबत येवला पोलीस ठाण्याचे ठाणेदार अमूल बच्छाव यांनी सांगितले की, ही घटना मागील दोन तीन दिवसांपूर्वीची असावी, असा अंदाज आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर अचूक माहिती कळू शकेल. हे हत्याकांड कौटुंबिक वादातून झाले आहे. अनिल देशमुख सातत्याने दारूच्या नशेत राहत असल्याचे तपासात समोर आले. दरम्यान, या घटनेनंतर दर्यापूरचे आमदार बळवंत वानखडे यांनी घटनास्थळी भेट घेतली असून पोलिसांची चर्चादेखील केली.