अमरावती- अमरावतीच्या मोर्शी तालुक्यातील कृषी उद्योग महामंडळाचा राज्यातील पहिला स्फुरद समृद्ध सेंद्रिय खत (प्रॉम) कारखाना मायवाडी येथे सुरू होणार आहे. कृषी विभागाच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेत राज्य कृषी उद्योग महामंडळातर्फे हा कारखाना उभारण्यात येणार आहे. दिवसेंदिवस रासायनिक खताचा अतिरिक्त वापर होत असल्याने जमीनीची सुपीकता कमी होत आहे. त्याला पर्याय म्हणून शेतक-यांना जैविक खतांचा वापर करण्यासाठी उद्युक्त करण्याच्या दृष्टीने स्फुरद समृद्ध सेंद्रिय खत कारखान्याची उभारणी करण्यात येत आहे. याचे भूमिपूजन कृषी मंत्री अनिल बोंडे यांच्या हस्ते करणात आले.
यावेळी बोलताना डॉ. बोंडे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी कृषी मंत्री पदाची जबाबदारी दिली. हा केवळ माझा बहुमान नसून मोर्शी वरुडमधल्या जनतेचा बहुमान आहे. कृषी क्षेत्रातील विविध बाबींच्या अनुषंगाने मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना तसेच शेतकरी हिताचे अनेक निर्णय राबविल्या जात आहेत. शासनाकडून संत्रा प्रक्रिया उद्योग ठाणाठुणी येथे उभारण्यात आला असून, लवकरच तिथे उत्पादन सुरू होऊन त्यासाठी परिसरातील उत्पादीत 300 टन संत्रा वापरला जाणार आहे. यासाठी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे.
मोर्शी तालुक्यातील मायवाडी येथे संत्रा प्रक्रिया केंद्रात महाराष्ट्रातील पहिल्याच शासकीय कृषी उद्योग प्रॉम (फॉस्फेट रिच ऑरगॅनिक मॅन्युअर) व निंबोळी अर्क/ पेंड प्रकल्पाचे भूमिपूजन केले. या कारखान्यातूम एका वर्षात उत्पादन सुरू व्हावे असेही कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे बोलताना म्हणाले. मोर्शीचे नगराध्यक्ष आप्पासाहेब गेडाम , श्रीमती वसुधाताई बोंडे, महामंडळाचे संचालक अशोक करंजकर, कृषी सहसंचालक सुभाष नागरे, महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक दिलीप ब्राह्मणकर, उद्योजक संजय जाधव आदी उपस्थित होते. प्रारंभी कृषी मंत्र्यांनी ड्रोनद्वारे फवारणीची प्रात्यक्षिकाची पाहणी केली.