अमरावती - शनिवारपासून अमरावती शहरालगत नांदगाव पेठ येथे 'दिनी इज्तेमा'ला सुरूवात झाली असून यासाठी राज्यभरातून मुस्लीम बांधव चांदूर रेल्वे मार्गे इज्तेमास्थळी पोहोचत आहे. सावंगी मग्रापूर ते मार्डीपर्यंत खराब झालेल्या रस्त्यामुळे या भाविकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याची बाब लक्षात घेता चांदूर रेल्वे परिसरातील मुस्लीम बांधवांनी रस्त्यावर पडलेले खड्डे मुरुम आणि मातीने बुजवले.
मुस्लीम बांधवांनी कुठल्याही शासकीय निधीची अपेक्षा न करता स्वत:च्या खर्चाने रस्त्याची दुरूस्ती केली. यामुळे मुस्लीम बांधवासह या रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्यांची सोय झाली. अवघ्या दोन दिवसांत दिवसभर काम करून या रस्त्याची दुरूस्ती करण्यात आली आहे. या कामाचे सर्व स्तरातून कौतूक होत आहे.
अमरावती शहरालगत नांदगाव पेठ एमआयडीसी परिसरात १ हजार २०१ एकर परिसरात दिनी इज्तेमाचे आयोजन करण्यात आले असून या सोहळ्यासाठी ४८ लाख चौरस फुटांचा भव्य सभा मंडप उभारण्यात आला आहे. या सभामंडपात एकाच वेळी ४ लाख मुस्लिम बांधवांना बसता येईल, अशी व्यवस्था आहे. या सभा मंडपाच्या दोन्ही भागात तीनशे फुटांची मोकळी जागा सोडण्यात आली आहे. या सोहळ्यात १० लाखाच्यावर मुस्लिम बांधव सहभागी होतील असा अंदाज आहे.
इज्तेमा सोहळ्याच्या आयोजनासाठी अमरावती विभागातील अमरावती, अकोला, बुलडाणा, यवतमाळ वाशिम सोबतच नागपूर जिल्हा आणि छत्तीसगड राज्यातील महत्त्वाच्या मशिदींनी जबाबदारी घेतली आहे. या ठिकाणी येणाऱ्या मुस्लिम बांधवांना ३० रुपयांमध्ये भोजनाची सोय करण्यात आली असून राहण्यासाठी एकूण ६० मंडपाची व्यवस्था करण्यात आली आहे. एका मंडपात एकाच वेळी ४ हजार लोक राहू शकतात, अशी व्यवस्था आहे. या शिवाय या परिसरात एकूण १३०० खासगी हॉटेलही लागले आहेत.