अमरावती : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते उद्धव ठाकरे सोमवारी अमरावतीला येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर, शहरात उद्धव ठाकरे हे हिंदुस्थानचे भाग्यविधाता भावी पंतप्रधान अशा आशयाचे पोस्टर झळकले आहे. शहरातील गर्ल्स हायस्कूल चौक येथे लावण्यात आलेले हे पोस्टर सध्या अमरावती शहरात चर्चेचा विषय ठरत आहे.
उद्धव ठाकरे सोमवारी अमरावतीत : सध्या राज्यात घडत असलेल्या धक्कादायक राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे हे रविवारपासून विदर्भ दौऱ्यावर आहेत. रविवारी उद्धव ठाकरे हे नागपूर आणि यवतमाळ येथे पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची संवाद साधणार आहेत. त्याचबरोबर रात्री आठ वाजता ते अमरावतीला येणार आहेत. सोमवारी अमरावती आणि अकोला जिल्ह्यातील शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी उद्धव ठाकरे संवाद साधणार आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारानंतर उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच अमरावतीत येत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी अमरावती शहरात सर्वत्र पोस्टर झळकले आहेत.
भावी पंतप्रधान या पोस्टरची चर्चा : 'आता महाराष्ट्र नाही तर दिल्ली काबीज करू हिंदुस्तानचे भाग्यविधाते भावी पंतप्रधान उद्धव साहेब ठाकरे यांचे अंबा नगरीत हार्दिक स्वागत.' असा मजकूर असणारे पोस्टर गर्ल्स हायस्कूल चौकात सर्वांचे लक्ष वेधत आहे. आता साडेचार वर्षानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच अमरावतीत येत असल्यामुळे, अमरावतीच्या शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत निर्माण केलेल्या दुसऱ्या गटाला अमरावती शहर आणि जिल्ह्यात फारसा प्रतिसाद मिळाला नाही. अमरावतीत आज देखील उद्धव ठाकरे यांना मानणाऱ्या शिवसैनिकांचीच संख्या अधिक आहे. आता राज्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे अमरावतीच्या शिवसैनिकांना नेमका कोणता ऊर्जावान संदेश देतात याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा -
- Maharashtra Political Crisis: उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांनी एकत्र यावं हा ज्याचा त्याचा प्रश्न - उदय सामंत
- Banner In Nagpur : राज-उध्दव एकत्र यावे यासाठी कार्यकर्त्यांनी नागपुरात लावले बॅनर; महाराष्ट्राला तुमची गरज...
- Maharashtra Political Crisis : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली मुख्यमंत्री शिंदे यांची भेट; राजकीय घडामोडींना आला वेग