अमरावती - केंद्राच्या कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी येथून दुचाकीने निघालेले महाराष्ट्राचे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आज ग्वाल्हेर येथील गुरुद्वारात दर्शन घेतल्यानंतर ते पलवलकडे दुचाकीने रवाना झाले आहे. हिवाळा असल्याने उत्तर भारतात थंडीचा कडाका जास्त आहे. मात्र, त्याची तमा न बाळगता महाराष्ट्राचे एक मंत्री चक्क दुचाकीवर हजारो समर्थकांसह नवी दिल्लीकडे निघाले आहेत. हे बघून जागोजागी शेतकरी तसेच स्थानिक नागरिकांकडून त्यांचे जंगी स्वागत होत आहे. दरम्यान, उद्या बच्चू कडू हे दिल्लीला धडक देणार आहेत.
हेही वाचा - कणकवलीत अज्ञाताने ३ दुचाकी जाळल्या, परिसरात खळबळ
गुरुद्वारामध्ये जेवणाची व्यवस्था
बच्चू कडू यांचे मंगळवारी सायंकाळी हजारो समर्थकांसह ग्वाल्हेर शहरात आगमन होताच जागोजागी त्यांचे जंगी स्वागत केले. तसेच, ग्वाल्हेर येथील शीख बांधवांनी रात्री व सकाळी गुरुद्वारा साहेबमध्ये सगळ्यांच्या जेवण व मुक्कामाची व्यवस्था केली होती. आज पुन्हा गुरुद्वारात विधीवत दर्शन घेत बच्चू कडू पलवलच्या दिशेने रवाना झाले. या वेळी, हजारो स्थानिक समर्थकांनी त्यांचा उत्साह वाढविला.
![बच्चू कडू लेटेस्ट न्यूज](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-am-01-bacchu-kadu-10016_09122020140049_0912f_1607502649_648.jpg)
![बच्चू कडू लेटेस्ट न्यूज](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-am-01-bacchu-kadu-10016_09122020140049_0912f_1607502649_950.jpg)
केंद्र सरकारविरोधात देशभरातील शेतकरी संघटनांनी काल (८ डिसेंबर) भारत बंदची हाक दिली होती. 'शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी ज्या लोकांनी या बंदमध्ये उस्फूर्त सहभाग नोंदवला, त्या सर्वांना माझा सलाम आणि मानाचा मुजरा', असे बच्चू कडू म्हणाले होते.
हेही वाचा - ॲमेझॉनला मराठी नको, मग आम्हालाही महाराष्ट्रात अॅमेझॉन नको; मनसेचा इशारा