अमरावती - येथील सायन्सकोर मैदानावर १७ ते २६ फेब्रुवारी दरम्यान 'लोपामुद्रा महोत्सवा'चे आयोजन करण्यात आले आहे. पर्यटन राज्यमंत्री मदन येरावर रविवारी सायंकाळी या महोत्सवाचे उद्घाटन करणार आहेत. राष्ट्रीय पारंपरिक लोकनृत्य, हस्तशिल्पकला, पर्यटन व सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी या महोत्सवनिमित्त अमरावतीकरांना लाभणार आहे.
लोपामुद्रा महोत्सवाबाबत शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत कॅनव्हास फाऊंडेशनचे आशिष शेरेकर यांनी माहिती दिली. या महोत्सवात ओरिसचे शंखवंदन, गोटीपुआ व संबलपुरी नृत्य, आसाम मधील जगप्रसिद्ध बिहू नृत्य, भूरताल नृत्य थालठुमरी हे नृत्य या महितस्वात सादर होणार आहेत. महाराष्ट्रातील लावणी, कोळी नृत्य, गोव्याचे घोडे मोडणी नृत्य, कळशीफुगडी, राजस्थानचे तेरा, ताल, भपंग, कठपुतली, कलबेलिया, मयूर नृत्य सादर होईल. गुजराथचे गरभा टिपदी नृत्य, मध्यप्रदेशचे वीर नाट्यम नृत्य, तेलंगणाचा माधुरी नबाडा नृत्य तसेच हिमाचल प्रदेशचे नाटी नृत्य या महोत्सवात सर्वांचे लक्ष वेधणार आहे.
उद्घाटन सोहळ्याला जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे, खासदार आनंदराव अडसूळ, आमदार डॉ. सुनील देशमुख, आमदार वीरेंद्र जगताप, महापौर संजय नरवणे, जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाने, आमदार डॉ. अनिल बोंडे, आमदार रमेश बुंदीले, प्रभूदास भिलावेकर आदी उपस्थित राहणार आहेत.