अमरावती: विभागीय शहर असणाऱ्या अमरावती शहरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे अशी मागणी गत 35 वर्षांपासून केली होती. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी किरण पातुरकर यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात एक लाख स्वाक्षऱ्यांची मोहीम राबविण्यात आली आहे. गत सहा वर्षांपासून किरण पातुरकर यांच्या वतीने अमरावती शहरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यावे यासाठी प्रयत्न सुरू होते. आता राज्य शासनाने अर्थसंकल्पात राज्यातील विविध शहरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जाहीर केले आहेत. त्यामध्ये अमरावतीचा देखील समावेश केला आहे. याबद्दल भाजपचे नेते किरण पातुरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार व्यक्त केले आहे.
मराठी भाषा विद्यापीठाची घोषणा: संपूर्ण देशात नामांकित असणाऱ्या अमरावती शहरातील श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाला क्रीडा अभिमत विद्यापीठाचा दर्जा, राज्य शासनाने अर्थसंकल्पात जाहीर केला आहे. श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाला मिळालेला हा दर्जा अमरावती शहर आणि जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तोरा रोवणारा आहे. महानुभा पंचांची काशी अशी ओळख असणाऱ्या जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यात येणाऱ्या रिद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठाची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली. मराठी भाषा विद्यापीठाच्या माध्यमातून जिल्ह्याला मोठा बहुमान मिळणार असून या विद्यापीठाच्या माध्यमातून अनेकांना नवी संधी उपलब्ध होणार आहे.
संत्रा प्रकल्पाला पाच कोटी: संत्रा उत्पादनात देशात आघाडीवर असणाऱ्या अमरावती जिल्ह्यातील वरुड येथील संत्रा प्रकल्पाला राज्य शासनाच्यावतीने पाच कोटी रुपयांचा निधी जाहीर करण्यात आला आहे. राज्य शासनाच्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अमरावती शहरात भव्य शिवस्मारक व्हावे या उद्देशाने छत्रपती शिवाजी महाराज उद्यानासाठी 50 कोटी रुपयांचा निधी अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आला आहे. अमरावती साकारल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत संपूर्ण माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे.
बेलोरा विमानतळाचा होणार कायापालट: गत अनेक वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या अमरावती शहरातील बेलोरा विमानतळाचा कायापालट करण्याचा निर्णय राज्य शासनाने या अर्थसंकल्पात जाहीर केला आहे. राज्य शासनाने केलेल्या मोठ्या आर्थिक तरतुदीमुळे आता अमरावती विमानतळावरून 31 डिसेंबर 2023 पर्यंत विमान मुंबई आणि पुण्यासाठी झेप घेईल अशी अपेक्षा शहराचे नगराध्यक्ष पातुरकर यांनी व्यक्त केली.
उद्योजकांना भरीव मदत: अमरावती शहर आणि जिल्ह्याचा औद्योगिक दृष्टीने विकास व्हावा यासाठी राज्य शासनाने अर्थसंकल्पात अमरावतीत उद्योजकांसाठी 900 कोटी रुपयांची सबसिडी जाहीर केली आहे. यामुळे अमरावती जिल्ह्यातील उद्योगाचा संपूर्ण बॅकलॉग भरून निघेल अशी अपेक्षा यांनी व्यक्त केली. आता औद्योगिक दृष्ट्या अमरावती शहर समृद्ध होईल असा विश्वास देखील किरण पातुरकर यांनी व्यक्त केला.
हेही वाचा: Maha Budget 2023 अर्थसंकल्पात टॅक्सबाबत महत्वाच्या घोषणा वाचा एका क्लिकवर