अमरावती - मागील काही महिन्यांपासून चांदुर बाजार तालुक्यात अवैध धंदे, अवैध वाळू वाहतूक, अवैध गुटखा विक्रीला मोठ्या प्रमाणात उधाण आले होते. यावर कोणाचा अंकुश नसल्याचे बोलले जात होते. तर निवडणूक काळात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न एरणीवर आला असता चांदुर बाजार पोलिसांनी अवैध देशी दारूवर कारवाई केली आहे.
अमरावतीवरून चांदुर बाजार शहरात फोर्ड गाडी क्रमांक एमएच ४३ एन ४३८३ मधून अवैधरीत्या देशी दारूच्या पेट्या चांदुर बाजार पोलीस ठाणे बोराळामार्गे येत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे पोलिसांनी स्थानिक भक्तिधाम येथे नाका बंदी करत गाडीची झडती घेतली. यावेळी गाडीमध्ये एकूण २५ देशी दारूच्या पेट्या आढळून आल्या.
पोलिसांनी आरोपी राहुल रमेश चव्हाण (वय २३, रा. इंदिरा नगर चांदुर बाजार) याला अटक करून फोर्ड गाडी व एकूण चार लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई ठाणेदार साळुंके यांच्या मार्गदर्शनात पोलीस हेड कॉन्सस्टेबल दिलीप नांदुरकर, अरविंद गावंडे, विक्की दुर्रने, विरेंद्र अमृतकरा यांनी केली. तर इतक्या मोठ्या प्रमाणात देशी दारूची वाहतूक होत असल्याने चांदुर बाजारमध्ये अवैध देशी दारूची विक्री जोरात सुरू असल्याचे दिसत आहे. तर या कारवाईमध्ये अमरावती वरून हा देशी दारू कोणाकडे पोहविली जात होती याचा तपास पोलीस करीत आहे.