अमरावती - जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातल्या वऱ्हा गावात राहणाऱ्या पती-पत्नीने कौटुंबिक वादातून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी रात्री घडली. नरेश श्रीराम मलघाम व पूजा नरेंद्र मलघाम असे आत्महत्या केलेल्या या जोडप्याचे नाव आहे. त्यांना २ लहान मुले असून त्यांनी उचललेल्या पावलाने संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले असल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
तिवसा तालुक्यातील वऱ्हा गावात मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे नरेश व पूजा मलघाम या जोडप्याने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पती-पत्नीमध्ये बुधवारी घरगुती कारणातून बाचाबाची झाली होती. त्यानंतर रात्री साडे ९ च्या सुमारास मलघाम यांच्या नातेवाईकानी त्यांच्या शेजाऱ्यांना फोन करत त्या दोघांची समजूत काढावी, अशी विनंती केली. या विनंतीवरुन शेजारी शंकर मडावी हे मलघाम यांच्या घरी गेले असता त्यांना पती-पत्नी दोघांनीही गळफास लावल्याचे खिडकीतून दिसले, मडावी यांनी लगेच पोलिसांना फोन करुन कळविले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व परिस्थितीचा आढावा घेत पंचनामा केला असून पुढील तपास सुरु आहे.
ह्या घटनेत पती-पत्नीने आपले आयुष्य संपवले पण, आता त्यांच्या लहानग्या मुलांचे काय? ही मुले पोरकी झाली आहेत. त्यांची जबाबदारी आता कोण घेणार, म्हणत परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.