अमरावती - सातपुडा पर्वतरांगेच्या कुशीत वसलेल्या मेळघाटात लाखो पर्यटक दरवर्षी येत असतात. मेळघाट हा अदिवासी बहुल भाग आहे. होळीच्या सणाला आदिवासी समाजात फार महत्त्व आहे. त्यानुसार दरवर्षी मेळघाटात होळीचा सण पारंपारिक पद्धतीने साजरा होत असतो. हा उत्सव सलग पाच दिवस चालतो. उदरनिर्वाहासाठी बाहेर गेलेले येथील सर्व मुळ रहिवासी हे सण साजरा करण्यासाठी येतात.
पहिल्या दिवशी शेतातील पीक व होलीकाचे पूजन केले जाते. एकाच दिवशी होलिका दहन होत नाही, वेगवेगळ्या दिवशी होळी पेटवली जाते. पहिल्या रात्री गावा बाहेरील मोकळ्या जागी आदिवासी नृत्य करत असतात. मेळघाटच्या गावांमध्ये मेघनाथ स्तंभ उभारला जातो. मेघनाथ हे आदिवासी समाजाचे दैवत असल्याने त्याची पूजा केली जाते.
मोह फुलापासून काढण्यात आलेली दारू सेवन करण्यासाठी दिली जाते. किणकी, ढोलकी, बासरीच्या तालावर आदिवासी रात्रभर पारंपारिक नृत्य करत असतात. पळसाच्या फुलापासून नैसर्गिक रंग खेळण्यात येतो. होळीनिमित्त मेळघाटातील काराकोठा, कातकुंभ, भरू या गावात मोठी यात्रा सुद्धा भरते. सातपुडा पर्वत रांगांतून वाहणाऱ्या तापी नदीला आदिवासी दैवत मानतात, पूजा करतात. घाटाचा मेळ असलेल्या मेळघाटातील आदिवासीमध्ये कोरकू, गोंड, राठीया या प्रमुख जाती अधिक प्रमाणात आहे. आदिवासींच्या सर्व जाती दरवर्षी पारंपरिक पद्धतीने होळी साजरी करण्यासाठी उत्सुक असतात. त्यामुळे मेळघाटातील होळी सणाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
हेही वाचा - चिकनचे दर कमी होताच अमरावतीत चिकनच्या दुकानावर खवय्यांची गर्दी