अमरावती - अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील मोझरी परिसरातील ७१०९ हेक्टर शेतजमिन सिंचनाच्या माध्यमातून पाण्याखाली आणून शेतकऱ्यांना समृद्ध केले जात आहे. त्यासाठी बहुप्रतिक्षित गुरुकुंज मोझरी उपसा सिंचन योजनेचे (Gurukunj Upsa Irrigation Scheme) पाणी अखेर आज १६१५ हेक्टर शेतजमिनीवर पोहचले आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाने (Irrigation Department) दिली आहे. यामुळे पहिल्या टप्प्यात सात गावातील हजारो शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. या प्रकल्पाचे जलपूजन आज पालकमंत्री यशोमती ठाकूर (Minister Yashomati Thakur) यांनी केले आहे. या सिंचन प्रकल्पाचे काम लवकरच पूर्ण होणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
सध्या या सिंचन प्रकल्पातून तिवसा तालुक्यातील गुरुदेव नगर, मोझरी, शेंदोळा, फत्तेपूर, माळेगाव या भागांतील शेकडो हेक्टर जमीन ही सिंचनाखाली येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता खरीपाबरोबरच रब्बी हंगामातील पिके घेण्यास मदत होणार आहे. त्यामुळे या सिंचनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची अर्थिक उन्नती होणार आहे.
- २०१३ मध्ये सुरू झाले होते या प्रकल्पाचे काम -
अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील मोझरी उपसा सिंचन योजना हा प्रकल्प २२ गावातील शेतकऱ्यांचे हिरवे स्वप्न पूर्ण करणारा आहे. या प्रकल्पाचा शुभारंभ हा काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या काळात झाला होता. जेव्हा हा प्रकल्प पूर्णतवास जाईल तेव्हा तबल ७१०९ हेक्टर शेतजमीन ही पाण्याखाली येणार आहे. काही कारणास्तव मागील आठ वर्षांत केवळ जवळपास २० ते २५ टक्केच काम पूर्ण झाले आहे. पण आता जून २०२२ पर्यत काम पूर्ण होईल, असे जलसंपदा विभागाचे म्हणणे आहे.
- १५४ कोटींपेक्षा जास्त खर्च -
या प्रकल्पासाठी १५४ कोटी पेक्षा जास्त खर्च येणार आहे. शेतात पाणी देण्यासाठी ५ हजार ठिकाणी आऊटलेट काढण्यात आले आहे. पाणी वापर संस्थेच्या निकषानुसार शेतकऱ्यांना या पाण्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत. गुरुकुंज मोझरी येथील दास टेकडीवरून हे पाणी सोडले जात आहे. आज अनेकांच्या शेतात पाणी पोहचले तर अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहचले नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
- सिंचन प्रकल्पासाठी अप्पर वर्धा धरणातून पाणी -
गुरुकुंज मोझरी उपसा सिंचन योजनेसाठी पश्चिम विदर्भातील सर्वात मोठ्या अप्पर वर्धा धरणातून पाणी घेतले आहे. या अप्पर वर्धा धरणातून येणारे पाणी हे या सिंचनासाठी वापरण्यात आले आहे.
- काय म्हणाल्या मंत्री यशोमती ठाकूर -
जिल्ह्यात सिंचनाचे क्षेत्र वाढावे यासाठी पूर्वीपासून निरंतर प्रयत्न होत आहेत. माजी आमदार दिवंगत भैय्यासाहेब ठाकूर यांनी 1984 मध्ये शेतकरी बांधवांना सिंचनासाठी पाणी मिळण्यासाठी या उपसा सिंचन योजना प्रकल्पाची मागणी केली. परिसरातील शेतीत पाणी पोहोचून शेतकरी बांधवांना बारमाही सिंचनाची सुविधा निर्माण व्हावी, असे त्यांचे स्वप्न होते. त्याची पूर्ती या योजनेच्या साकारण्यातून होत आहे. योजना पूर्णत्वास जाण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करत विविध तांत्रिक अडचणींवर मात करण्यात आली.
- अनेक गावांचा या योजनेत समावेश-
त्यानुसार उर्ध्व वर्धा सिंचन प्रकल्प योजनेंतर्गत गुरुकुंज उपसा सिंचन योजना साकारण्यात येत आहे. या योजनेमुळे गुरुदेवनगर, मोझरी, शेंदोळा (खु.), विचोरा, मालेगाव, फत्तेपूर, शिवणगाव, कोळवण, शेंदुरजन (बु.), शेंदुरजन (खु.), अनकवाडी, रघुनाथपूर, रंभापूर, पाळवाडी, काडगव्हाण, अदमपूर, धोटे, व-हा, भांबोरा, वाठोडा, मालधूर, शिरजगाव आदी 22 गावांना व सुमारे सात हजार 109 हेक्टर शेतीला या प्रकल्पाचा लाभ होणार आहे. प्रकल्पाच्या कामांनी गती घेतली असून, विंचोरी येथे उपकालव्याद्वारे शेतापर्यंत पाणी पोहोचले आहे. लवकरच इतर कामही पूर्ण होईल, असेही त्या म्हणाल्या.