अमरावती - केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा आज पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ होत असतानाच जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी नियोजन भवन येथे जिल्हास्तरीय लाभ वितरणाच्या कामाला सुरुवात केली. वनहक्क कायद्यांतर्गत जिल्हा समितीने पात्र केलेल्या शेतकरी कुटुंबांचाही या योजनेत समावेश करण्यात आला आहे.
या योजनेबाबत बोलताना खासदार आनंदराव अडसूळ यांनी केंद्र सरकारने देशभरातील शेतकऱ्यांच्या हिताचे धोरण राबवल्याचे सांगितले. अनेकदा पाण्याचा पत्ता नसतो, तर कधी अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान होते. अशावेळी पिक विमा योजनेद्वारे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाल्याचा दावाही अडसूळ यांनी केला. ते म्हणाले, की आता पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही शेतकऱ्यांसाठी मोठा आधार देणारी योजना केंद्र सरकारने आणली आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात वर्षाला ३ टप्प्यात २ हजार रुपये असे एकूण ६ हजार रुपये मिळणार आहेत. ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याने मध्यस्थाची भीती नाही. आज वर्षाला ६ हजार म्हणजे महिन्याला ५०० रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहे. आता कुणी ६ हजार रुपयांवर आक्षेप घेतील, मात्र यापूर्वी एकाही सरकारला अशी मदत देणे सुचले नाही हे लक्षात घ्यावे. आज वर्षाला मिळणारे ६ हजार रूपये पुढे ६० हजार होतील, असाही दावा खासदार अडसूळ यांनी केला.
या सोहळ्याला पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्यासह खासदार आनंदराव अडसूळ, विभागीय आयुक्त पियुष सिंह, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, निवासी जिल्हाधिकारी नितीन व्यवहारे प्रामुख्याने उपस्थित होते. पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या हस्ते जिल्ह्यातील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना या योजनेच्या लाभाचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाला अनेक शेतकरी, तलाठी ग्रामसेवक, कृषी सहायक आदी उपस्थित होते.