अमरावती - सकाळच्या सुमारास कुणी मुली शाळेत जाताना दिसतात, तर कुणी घरकामात व्यस्त असतात. मात्र, अमरावीच्या मोर्शी बसस्थानकात सकाळीच एक मुलगी येते अन् जगण्यासाठी २ पैसे कमवण्याची तिची धडपड सुरू होते. माधुरी कुमरे असे त्या मुलीचे नाव. माधुरी सकाळीच बसस्थानकातून वृत्तपत्र घेऊन घरोघरी वाटण्याचे काम करून कुटुंबाला हातभार लावण्याचे काम करीत असते.
मोर्शीच्या झोपडपट्टीत किरायाच्या घरात माधुरी राहते. माधुरीच्या घरची परिस्थिती अत्यंत बेताची आहे. राहायला हक्काचा निवारा नाही. आई हातमजुरी करते, तर वडील गवंडी काम करतात. दोन वेळची भाकर मिळण्याची सोय नाही. त्यामुळे माधुरीने काहीतरी काम करून घरी हातभार लावण्याचे ठरवले. आईवडिलांना मुलगा नाही. मात्र, मुलालाही लाजवेल असे काम माधुरी करते.
दररोज सकाळी ६ वाजता बसस्थानकात येऊन वाहनातील पार्सल उतरवणे. त्यानंतर ते दुकानावर विकणे आणि सायकलने घरोघरी जाऊन वृत्तपत्र वाटप करण्यापर्यंतचे सर्व कामे माधुरी करीत असते. एवढेच नाहीतर काम करून ती शाळाही शिकते.
स्पर्धेच्या या युगात मुली आणि मुले हे समसमान आहे. मुलगी असल्याची कुठलीही भीती न बाळगता मुलीने सुद्धा स्वतःच्या पायावर उभे राहावे. आज वृत्तपत्र वाटून मी अगदी कमीवेळात पैसे कमवू शकते. त्यामुळे मला भाऊ नसला तरी माझ्या आई वडिलांसाठी मीच मुलगा असल्याचे माधुरी सांगते. तसेच हक्काचे घर नसल्याने सरकारने मदत करण्याची मागणी तिच्या वडिलांनी केली आहे.