अमरावती - गणरायाच्या पाठोपाठ रविवारी महालक्ष्मी अर्थात ज्येष्ठा गौरीचे आगमन झाले. आज (सोमवार) ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरींचे पूजनासह गौरींना नैवेद्य अर्पण केला जातो. विदर्भात सोळा प्रकारच्या विविध भाज्यांसह आंबील, फळांच्या नैवेद्याला महत्त्व आहे. सायंकाळी सहा वाजता गौरींना केळीच्या पानावर नैवेद्य अर्पण केल्यावर आरती केली जाते. तर काही ठिकाणी दुपारी एक वाजता गौरी पूजनाचीही परंपरा आहे.
'अशी' आहे ज्वारीची आंबील, फळे बनवण्याची प्रक्रिया -
ज्येष्ठा गौरी पूजनाला आंबील फळाच्या नैवेद्याचे महत्त्व आहे, आंबील ज्वारीपासून तयार केली जाते. यासाठी ज्वारीला दोन तासांपर्यंत पाण्यात भिजवले जाते. यानंतर ज्वारीला काहीवेळ सुकविले जाते. यानंतर चाळून आणि पाखडून या ज्वारीचे रवेदार पीठ केले जाते. या नंतर हे पीठ ताकामध्ये भिजवले जाते. यानंतर ताकात भिजवलेल्या पिठाला गरम पाण्यामध्ये शिजवून त्यामध्ये चण्याची डाळ, सुंठ पावडर, खोबर्याचे तुकडे, विलायची पावडर घालुन हे संपूर्ण मिश्रण पाणी घालून शिजवून आंबील तयार केली जाते. तर ज्वारीचे पीठ गरम पाण्यात भिजवून या पिठाचे पुरीच्या आकाराचे फळ तयार केले जातात. या फळांना गरम पाण्याच्या वाफेवर शिजवले जाते.
नैवेद्यामध्ये सोळा भाज्या आणि चटण्यांचा ही मान -
ज्येष्ठा गौरीला अर्पण केल्या जाणाऱ्या नैवेद्यामध्ये आंबील फळांसोबतच ताकात बेसन भिजवून तयार केल्या जाणाऱ्या कथलीला सुद्धा महत्त्व आहे. लसण, अद्रक आणि हिरव्या मिरच्या टाकून ही कथली तयार केली जाते. यासोबतच एकूण सोळा प्रकारच्या विविध भाज्या नैवेद्यात असतात. यामध्ये काशीफळ अर्थात कवळ्याच्या भाजीला सर्वाधीक मान आहे. या भज्यासोबातच तीळ, चणाडाळ, जवस, शेंगदाणा, मूग, हिरवी मिरची, कोथिंबीर, काकडी, गाजर, कराळ अशा सोळा प्रकारच्या विविध चटण्या ही नैवेद्यात असतात.
सोळा पुरणपोळ्या आणि आळुच्या वड्या -
ज्येष्ठा गौरीच्या नैवेद्यामध्ये कुणाच्या सोळा पोळ्यांना मान आहे. यासोबतच आळुच्या वड्या, मुगाचे वडे, भजे यांना सुद्धा मान आहे. लाडू, करंजी, अनारसे, पापड्या यांचा फुलोरा ज्येष्ठा गौरीला अर्पण केला जातो.
हेही वाचा - Gauri Festival : गौरींचे उत्साहात आगमन; 'अशी' आहे कोकणातील गौरी आगमनाची परंपरा