अमरावती - शहरात वरली मटका आणि क्रिकेट सट्ट्या सारखे जुगार मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. कोणी सट्टा लावत असेल तर पोलीस काय करणार, असा सवाल करत, सट्टा कुठे लावला जातो हे आमच्यासोबत येऊन दाखवा, असे आवाहन पोलीस आयुक्त डॉ. संजय बाविस्कर यांनी केले आहे. पोलीस आयुक्तांच्या या अजब भूमिकेमुळे अमरावतीकर हैराण झाले आहेत. सोशल मीडियावर पोलीस आयुक्तांच्या अजब गजब वक्तव्याची खिल्ली उडविले जात आहे.
शहरात सट्टा कुठे चालतो हे नागरिकांनी आम्हाला सांगावे. ज्याठिकाणी सट्टा चालतो त्याठिकाणी सुजाण नागरिक आणि पत्रकारांनी पोलिसांना तिथे सोबत न्यावे. यामुळे पोलिसांना कारवाई करता येईल आणि नागरिक आणि पत्रकारांच्या माध्यमातून आम्हाला साक्षीदार म्हणून पंचही सापडतील, असे म्हटले होते. अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्या उपस्थितीत पोलीस आयुक्त यांनी हे वक्तव्य केले होते.
पोलीस आयुक्तांच्या या वक्त्यावरून अनेकजण चकित झालेत. शहर काँग्रेसचे अध्यक्ष किशोर बोरकर यांनी सोशल मीडियावर पोलीस आयुक्तांच्या वक्तव्यावर व्यंगात्मक पोस्ट शेअर केली. त्यावर अनेकांनी पोलीस आयुक्त आणि पोलीस प्रशासनाची खिल्ली उडविली. अमरावती शहरात बडनेरा, फ्रेजरपुरा, वडाळी, चपराशिपुरा या भागात वरली मटक्याने धुमाकूळ घतला आहे.
पोलीस आयुक्तांनी शहरातील वरली मटका आणि क्रिकेटवर लागणार सट्टा यावर आळा घालावा अन्यथा आम्ही जे सट्टा चालवितात त्यांची नवे वृत्तपत्रात जाहीर करू. यामुळे आमच्या जिवाला धोका निर्माण झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी पोलीस आयुक्तांची असेल, असे किशोर बोरकर यांनी 'ईटीव्ही भारत' सोबत बोलताना म्हटले आहे.
युवक काँग्रेसचे समीर जवंजाळ यांनी २-३ वर्षांपूर्वी पालकमंत्र्यांनी स्वतः जुगार अड्ड्यावर धाड टाकून पोलीस यंत्रणेची पोलखोल केली होती. आज पोलीस शहरात सुरू असणाऱ्या अवैध धंद्यांविरोधात कुठलीही कारवाई करीत नसल्याने पोलीस यंत्रणेचा निषेध नोंदविले आहे.
शिवसेना युवासेना जिल्हा उपाध्यक्ष राहुल माटोडे यांनी जिकडे तिकडे जुगार अड्डे सुरू आहेत. आता पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे आणि आमदार डॉ. सुनील देशमुख यांनी या गंभीर प्रकरणात लक्ष देण्याचा विनंती केली आहे. अंबादेवी आणि एकविरादेवीच्या अंबानगरीत अवैध धंद्यांना उधाण आले असताना पोलिसांनी डोळ्यात डांबर घातले असल्याची टीका राहुल माटोडे यांनी केली आहे.
पोलिसांनी गांभीर्याने आपली जबाबदारी पार पाडावी आणि शहरातील गरीब, सर्वसामान्य आणि श्रीमंत, अशा सर्व वर्गांतील नागरिकांचा जीव घेणाऱ्या सट्ट्या विरूद्ध धडक मोहीम हाती घ्यावी, अशी मागणी अमरावतीकर पोलीस आयुक्तांकडे करीत आहेत. आता पोलीस आयुक्त लोकांची मागणी किती मनावर घेतात याकडे अमरावतीकरांचे लक्ष लागले आहे.