अमरावती - भाजपा किसान मोर्चा, रयत क्रांती संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष आणि शिवसंग्राम पक्षाच्यावतीने १ ऑगस्ट पासून राज्यव्यापी दूध आंदोलन केले जाणार आहे. भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष व माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी याबाबत आज घोषणा केली. या आंदोलनाद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत दूध पोहचवत दुधाला योग्य भाव मागितला जाणार आहे.
महाराष्ट्रात दररोज १ कोटी ४० लाख लिटरच्या आसपास दुधाचे उत्पादन होते. सध्या कोरोनाच्या संकटामुळे दूध व्यवसाय अडचणीत सापडला आहे. कोरोनाच्या परीस्थितीमुळे राज्यातील सर्व हॉटेल्स, स्वीट होम, चहा टपऱया, डोमीनोझ पिझ्झा अशा प्रकारे दूध व दुधाच्या पदार्थांची विक्री करणाऱ्या सर्व आस्थापना बंद झाल्या आहेत. अजूनही या आस्थापना पूर्णत: सुरू झालेल्या नाहीत. परिणामी २० मार्च २०२० पासून पॅकिंग दुधाचा खप ३० ते ३५ टक्क्यांपर्यंत खाली आलेला आहे. तसेच दुधाच्या पदार्थांची विक्री १० ते १५ टक्क्यांपर्यंत खाली आली आहे. दुधाचे दर कमी झाल्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना पैसे मिळण्यास अडचण येत आहे. राज्य सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रती लिटर १० रुपये अनुदान द्यावे. अथवा गाईचे दुध प्रती लिटर ३० रुपये दराने खरेदी करावे. या मागण्या घेऊन हे दूध आंदोलन करण्यात येणार आहे.
हे आंदोलन अत्यंत साध्या पद्धतीने करावे. कोणीही दूध रस्त्यावर फेकणार नाही. कोणीही दुधाचा टँकर पेटवणार नाही. शांततेच्या मार्गाने आंदोलनकरून हे दूध मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. राज्यातील सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांनी या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन माजी कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी केले आहे.