अमरावती - अमरावती ते अकोला मार्गावर (Amravati Akola Highway) लोणी ते माना गावादरम्यान दोन्ही बाजूंनी एकूण 75 किलोमीटरचा मार्ग 104 तासात पूर्ण (75 KM Work in 104 Hr) करण्याचा विक्रम राजपूत इन्फ्रा कॉम प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने केला. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदविण्यात (Guinness World Record आलेल्या या विक्रमी कार्यात पुरुषांसोबतच चार तरुणींचाही मोठा वाटा आहे. पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून आम्हीसुद्धा या विश्वविक्रमी कार्यात सहभागी असल्याचा आम्हाला अभिमान असल्याची भावना या तरुणींनी खास 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केली.
या तरुणींचा सहभाग - अतिशय जोखमीचे क्षेत्र असणाऱ्या बांधकाम क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या पंढरपूर येथील अपर्णा निकम, सोलापूरच्या इरावती कदम, कोल्हापूरच्या तेजस्विनी पाटील या तरुणींनी राजपथ इन्फ्रा कॉम प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे. या तिघींसोबतच भंडारा येथील आयुषी वरघंटीवार यांची भूमिकासुद्धा अतिशय महत्त्वाची ठरली.
विश्वविक्रम नोंदविण्यात आमचा वाटा याचा सार्थ अभिमान - हा विश्वविक्रम नोंदविण्यात आमचा छोटासा वाटा आहे. नियोजन आणि कामाची अंमलबजावणी ही जबाबदारी आमच्याकडे होती. सलग एकशे चार तास जे काही काम सुरू होते त्या कामाची प्रत्येक तासाची माहिती आम्ही गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या चमूला देत होतो. यामध्ये आम्ही नेमके किती आणि कोणते साहित्य वापरत आहोत, कशाप्रकारे काम होते, अशी सर्व माहिती प्रत्येक तासाला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डला देण्याची जबाबदारी आम्ही पार पाडली. हे अतिशय कॉन्सन्ट्रेशनचे काम होते. हे काम आम्ही यशस्वीरित्या पार पाडले, याचा खूप आनंद होतो आहे, असे अपर्णा निकम म्हणाल्या.
कामात कुठलाच भेदभाव नाही - सहसा मुली या कामासाठी सुरक्षित ठिकाण निवडतात. मात्र, गेल्या सात-आठ वर्षांपासून राजपथ कंपनीसोबत मी जुलैपासून घरापासून इतक्या लांब काम करताना अजिबात काही त्रास झाला नाही. या भागात आम्हाला कुठलीच अडचण आली नाही. सकाळी नऊ ते रात्री दहा वाजेपर्यंत आम्ही काम करत होतो. आमचे प्रमुख जगदीश कदम हे मुलांसारखी जबाबदारी आम्हा मुलींवरही देत होते. मुलं-मुली असा कुठलाही भेदभाव या कामादरम्यान जाणवला नाही. राष्ट्र सेवेसाठी हे काम केले असल्याने आम्हाला या कामाचा अभिमान असल्याचे तेजस्विनी पाटील म्हणाल्या.
उत्साह कायम होता - आमचे प्रमुख जगदीश कदम यांनी 75 किलोमीटरचे टार्गेट ठेवले होते. मात्र, या टार्गेट पेक्षा थोडे जास्तच काम आम्ही विश्वविक्रम नोंदवताना केले आहे. कामाचा उत्साह इतका होता की या भागातील उष्णता आणि टार्गेट पेक्षा अधिक काम करताना काही त्रास होत आहे, असे जाणवलेच नाही, असे इरावती कदम म्हणाल्या.
हेही वाचा - Amravati-Akola highway : अमरावती अकोला महामार्गावर विश्वविक्रम; 104 तासात साकारला 75 किलोमीटरचा मार्ग