अमरावती - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज देशाचा अर्थसंकल्प मांडला आहे. यात शेतकऱ्यांची कर्जमर्यादा १६.५ लाख कोटी पर्यंत वाढवली आहे. बियाण्यांसाठी दहा हजार कोटी, सूक्ष्म सिंचनासाठी दहा हजार कोटी, पशुपालनासाठी चाळीस हजार कोटी, आदी शेतकऱ्यांसाठी विशेष योजना या अर्थसंकल्पात मांडल्या आहे. त्यामुळे हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांसाठी वरदान असल्याची प्रतिक्रिया माजी कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी दिली.
अर्थसंकल्पावर बोलताना बोंडे म्हणाले, ''कापसासाठी पाच लाख कोटींचे नियोजन, सात टेक्स्टाईल पार्क करण्याची घोषणा आजच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. तसेच सर्व कागदपत्रे ही आता डिजिटल होणार असून गावातील गरीबाचे घरही त्यांच्या नावाने होणार आहे.''
शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होणार
रेल्वे रूळ, रस्ते बांधकाम याची व्याप्ती वाढवल्याने इंजिनिअर, कामगार यांना रोजगार मिळणार आहे. २०१३ मध्ये शेतकऱ्यांच्या मालाची जेवढी खरेदी होत होती. त्यापेक्षा कितीतरी पट खरेदी २०२१ मध्ये होत असून त्याचा परतावा दिला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा उद्देश या अर्थसंकल्पात मांडलेला आहे. २०२२ पर्यत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होईल, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. याच दिशेने हा अर्थसंकल्प आहे, असेही डॉ. अनिल बोंडे म्हणाले
हेही वाचा - जाणुन घ्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काय मिळाले?