अमरावती - देश एकीकडे कोरोनाच्या सावटाखाली असतानाच मेळघाटाच्या वनपरिक्षेत्रातील एका वन अधिकाऱ्याची बदली झाल्याच्या आनंदात मटणाची जंगी पार्टी रंगल्याचा गंभीर आरोप मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी केला आहे. याबाबत पालकमंत्री यशोमती ठाकूर व जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याकडे तक्रार केली होती. पण, असे काही झालेच नसल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.
मेळघाट व्याग्र प्रकल्पातील वन विभागाच्या कारागोलाई कॅम्पमध्ये 10 वन अधिकाऱ्यांसह 40 वन कर्मचाऱ्यांनी मटण पार्टी केल्याचा आरोप मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी केल्याने एकच खळबळ माजली होती. जिल्हा प्रशासनाला पत्र लिहून या कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी केली होती. तशी रीतसर तक्रार त्यांनी अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर, जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या सह वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली होती.
सध्या देशात लॉकडाऊन आहे. कोरोनाग्रस्त रुग्णाची संख्या ही झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत सर्व शासकीय यंत्रणा जीव ओतुन काम करत असताना मात्र मेळघाटमधील वन अधिकारी हे एका वन अधिकाऱ्याच्या झालेल्या बदलीचा आनंद साजरा करत असल्याचे समोर आले आहे. 10 मोठे वन अधिकारी सह 40 ते 50 वन कर्मचारी यांनी चिखलदरा तालुक्यातील वनविभागाच्या कारागोलाई कॅम्पमध्ये आज सकाळी 10 ते साडेदहाच्या सुमारास सर्वांनी एकत्र येऊन सर्व वन कायदे व नियमाचा भंग करून मटण पार्टी केली असल्याची माहिती आमदार राजकुमार पटेल यांना मिळाली असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले होते.
पण, राजकीय द्वेषापोटी काहींनी ही खोटी बातमी दिल्याने ही तक्रार केल्याचे आमदार पटेल यांनी सांगितले. ज्यावेळी याबाबतची शहानिशा झाली त्यानंतर आमदार पटेल यांनी याबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे.
हेही वाचा - अमरावती 'रेड झोन'मध्ये; कोरोनाग्रस्तांची संख्या 43, 7 दगावले