लातूर - लोकसभा निवडणुकीदरम्यान कामातील कुचराई कर्मचाऱ्यांच्या चांगलीच अंगलट आली. कर्तव्यावरील क्षेत्रीय अधिकारी, केंद्राध्यक्ष व ३ मतदान अधिकार्यांनी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी ५ अधिकार्यांची वार्षिक वेतनवाढ बंद केली आहे. या निवडणुकीतील ही सर्वात मोठी कारवाई समजली जात आहे.
लातूर लोकसभा मतदारसंघासाठी १८ एप्रिलला मतदान झाले. या मतदानादरम्यान काही मतदान केंद्रांवरील व्हीव्हीपॅट मशीनसंदर्भात तक्रारी उद्भवल्या. यामध्ये उदगीर तालुक्यातील डोंगरशेळकी, गुडसूर या केंद्रांवर मतदान सुरू होताच बिघाड होऊनही येथील विभागीय अधिकारी पी. आर. बच्चंती यांनी सूचनांचा भंग करीत कामकाजात निष्काळजीपणा केला. यामुळे बच्चंती यांची वार्षिक वेतनवाढ कायमस्वरूपी रोखण्याचे आदेश दिले.
चाकूर तालुक्यातील चापोली येथील मतदान केंद्रात केंद्राध्यक्ष तसेच अन्य तीन मतदान अधिकार्यांनी निवडणूक आयोगाच्या सूचनांचे पालन केले नाही. यामुळे केंद्राध्यक्ष राजकुमार पाटील, मतदान अधिकारी संजय गोविंदराव सगरे, प्रीती शिवराज माने व साईनाथ निवृत्ती माने या चारही अधिकार्यांची वार्षिक वेतनवाढ कायमस्वरूपी बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. लातूर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी केलेली ही कारवाई आजपर्यंतची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. प्रतिक्रिया संदर्भात जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्याशी संपर्क केला असता कामानिमित्ताने बाहेर गावी असल्याचे सांगण्यात आले.