अमरावती : अमरावती शहराच्या पहिल्या महिला पोलीस आयुक्त म्हणून आरती सिंह या बुधवारी रुजू झाल्या. अमरावतीचे माजी पोलीस आयुक्त संजय बाविस्कर यांच्याकडून आरती सिंह यांनी पदभार स्वीकारला. यानंतर पोलीस आयुक्त म्हणून आरती सिंह यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
बनारस येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेतून एमबीबीएस झाल्यावर स्त्री रोग तज्ज्ञ म्हणून काम करताना मुलींचा जन्म होणे हे मोठे पाप असल्याचा गैरसमज समाजात असल्याचा अनुभव मला वारंवार यायचा. मुलीला जन्म देणाऱ्या माता अक्षरशः घाबरून जायच्या. मुलगी झाली आता घरचे मला वागवणार नाही, अशी भीती महिलांमध्ये मी पहिली आहे. ही वाईट परिस्थिती पाहता मुलींना सन्मान मिळावा या उद्देशाने मी आयपीएस झाले. आज महिला म्हणून पोलीस आयुक्त पदावर मी आले असल्याचे आरती सिंह म्हणल्या.
पोलीस खात्यात रुजू होताच पहिली पोस्टिंग नक्षलग्रस्त भाग असणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात मिळाली. पोलीस अधीक्षक म्हणून गडचिरोलीत केलेल्या खडतर सेवेबाबत विशेष पुरस्कार मिळाला असल्याचे आरती सिंह यांनी सांगितले. गडचिरोलीनंतर भंडारा पोलीस अधीक्षक, नागपूर पोलीस अधीक्षक, नागपूर सीआयडी पोलीस अधीक्षक अशी आठ वर्षांची सेवा विदर्भात झाली असून औरंगाबाद आणि नाशिक येथे पोलीस अधीक्षक म्हणून सेवा दिल्यावर पुन्हा आता विदर्भात तेही पश्चिम विदर्भाची राजधानी असणाऱ्या अमरावतीला आली आहे.
महिलांवर होणाऱ्या अत्याचाराबाबर मी अतिशय संवेदनशील आहे. महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांना आळा बसविण्यास माझे प्राधान्य राहील, असे त्या म्हणाल्या. जुगार, वारली मटका अवैध दारुविक्री हा प्रकार आता शहरात कुठेही दिसणार नाही. कुणी नेता, लोकप्रतिनिधी कोणत्याही कारवाईत हस्तक्षेप करीत असल्याचा मला तरी अनुभव नाही. त्यामुळे इथेही समाजहितासाठी काम करणाऱ्या पोलिसांच्या कामात कोणत्याही लोकप्रतिनिधींचा हस्तक्षेप राहणार नाही, असे आरती सिंह म्हणाल्या.
आमच्या पोलीस अधिकारी आणि कर्मचऱ्यांना कामाचा ताण राहणार नाही, याची काळजी घेतली जाईल. शहरातील कोणत्याही भागात अवैध धंदे चालत असतील तर कोणत्याही व्यक्तीने थेट माझ्याकडे तक्रार केली तरी मला हरकत नाही, असे त्या म्हणाल्या.
हेही वाचा - सत्तेच्या ताकदीचा दुरुपयोग बरा नव्हे, नवनीत राणांची शिवसेनेवर टीका