अमरावती - हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार पुढील ३ दिवस विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सर्वत्र पाऊस धारा बरसत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मृग नक्षत्रात पावसाची दमदार एंट्री झाल्याने नदी-नाल्यांना पूर आला आहे. अमरावती जिल्ह्यातून जाणारा नागपूर-मुंबई स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गालगत असलेल्या शेतातील पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था कंत्राटदाराने न केल्यामुळे महामार्गालगत असलेल्या वाढोना परिसरातील अनेक शेतात पावसाचे पाणी तुंबले आहे.
पाणी तुंबल्याने शेतीचे मोठे नुकसान -
कंत्राटदारांच्या ढिसाळ नियोजनामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी तुंबले आहे. पाणी तुंबल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. एन खरीप हंगामात पेरणीच्या वेळी शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला समोर जावे लागत आहे. त्यामुळे नुकसानीची भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
या जिल्ह्यातून जाणार समृद्धी महामार्ग -
समृद्धी महामार्ग नागपूर ते मुंबई दरम्यान १२ जिल्ह्यातून जाणार आहे. हे जिल्हे पुढीलप्रमाणे – नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, वाशिम, अकोला, बुलडाणा, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक, ठाणे व मुंबई! तसेच पाच महसूल विभाग येतात. अप्रत्यक्षपणे काही जिल्हे चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, धुळे, जळगाव, पालघर व रायगड यांनाही जलद वाहतुकीचा फायदा होणार आहे. जवळपास २६ तालुके व ३९२ गावांचा संबंध या समृद्धी महामार्गाशी येणार आहे.
महामार्गावर विमान उतरु शकेल असा रन वे -
या महामार्गात ४०० वाहनांसाठी व ३०० पादचाऱ्यांसाठी विशेष जागा देण्यात आली आहे. यामुळे महामार्गाला जोडताना स्थानिक वाहतूक सुरळीत व सुरक्षित असणार आहे. अपघातांचे प्रमाणही कमी होईल, कारण झिरो अॅक्सिडेंटल कॉरिडोर असणारा हा देशातील पहिलाच महामार्ग ठरणार असे म्हटले जात आहे. हा महामार्ग खासगी भागिदारीतून होणार असल्यामुळे टोलही पडणार आहे. टोल हा प्रवास केलेल्या अंतरावरच पडणार व तो स्वयंचलित असणार आहे. या महामार्गाचा वापर गॅस पाईप लाईन, इलेक्ट्रिक लाइन वा आप्टिकल फायबर केबलसाठी करण्याचा मानस आहे. युद्धजन्य परिस्थितीत अथवा नैसर्गिक आपत्ति दरम्यान महामार्गावर विमान उतरु शकेल असा रन वे असणार आहे.