अमरावती - जिल्ह्यातील तिवसा येथील सारसी, सातरगाव रोडवरील असलेल्या वनविभागाच्या जंगलात गेल्या तीन दिवसांपासून आग लागत आहे. आजही ही आग मोठ्या प्रमाणावर लागल्याने आग विझवण्यासाठी गेलेल्या तिवसा नगरपंचायतची अग्निशमन दलाची नवीन गाडीच जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. नगरपंचायतचे तीन कर्मचारी यात किरकोळ जखमी झाले आहेत.
हेही वाचा - शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, 31 मार्चला होणार एन्डोस्कॉपी
तिवसा येथे जंगल पेटले
दरम्यान, अग्निशमन दलाची गाडी विझवण्यासाठी चांदूररेल्वे येथील दुसरी अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली आहे. तिवसा येथे जंगलाला आग लागण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. ही आग नियंत्रणाबाहेर गेल्यानंतर तिवसा अग्निशमन दलाच्या गाडीला आग विझवण्यासाठी पाचारण करण्यात आले होते. मात्र, ही आग विझवण्यापूर्वीच तिवसा नगरपंचायतची गाडीच जळून खाक झाली. यावेळी मुख्याधिकारी पल्लवी सोटे, माजी नगराध्यक्ष वैभव वानखडे उपस्थित होते.
तिवसा नगरपंचायतची अग्निशमन गाडी जळून खाक
वनविभागाच्या जागेतील आग गावात पसरू नये यासाठी ती आटोक्यात आणताना अग्निशमन दलाच्या गाडीलाच आग लागली. या घटनेत जीवितहानी झालेली नाही. तिवसा तालुक्यातील व शहरातील आगीच्या १२ घटना या वाहनाने नियंत्रणात आणल्या होत्या. पत्रव्यवहार करूनसुद्धा जिल्हा प्रशासन व नगर विकास शाखेने या वाहनांवर कंत्राटी पद्धतीनेसुद्धाने पदं भरले नाहीत. एक वर्षांपूर्वीच सदर गाडी अग्निशमन दलात पालकमंत्री यशोमती ठाकूर, जिल्हा नियोजन समिती व नगर पंचायतमार्फत सामील झाली होती. तालुक्याच्या ठिकाणी अत्यंत आवश्यक असलेले ही अग्निशमनची गाडी आज जळून खाक झाले. ज्या अधिग्रहित विहिरीवरून तिवसा शहराला पाणीपुरवठा होतो, त्या विहिरीवरून अग्निशमन दलाला देखील पाणीपुरवठा व्हावा यासाठीसुद्धा जिल्हा नियोजन समितीने २४ तास वीज पुरवठाचे काम मंजूर केले होते. पण काही शेतकऱ्यांनी हे काम महिन्याभरापासून थांबवून ठेवले आहे. त्यामुळे तिवसा शहराला पाणी टंचाई व अग्निशमन दलाला पाणीपुरवठा होण्यास अडचण निर्माण होत आहे.
हेही वाचा - पंढरपूर मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून भगीरथ भालके यांना उमेदवारी