अमरावती - विदर्भात आता मान्सून सक्रिय झाला असून, मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यातच पुढील तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा देखील देण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची लगबग केली आहे. परंतु जमिनीत किमान सात इंच ओलावा आणि शंभर मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये असं आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
आधीच बियाणे महाग आहे, त्यात दुबार पेरणी खर्च हा शेतकऱ्यांना परवडणारा नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी 15 ते 17 जून नंतरच पाऊस पाहून पेरणी करावी आणि बियाण्यांची उगवणशक्ती देखील तपासावी असं आवाहन देखील कृषी विभागाच्या वतीने करण्यात आलं आहे. गेल्या वर्षी शेतकऱ्यांनी घाईगडबडीने पेरणी केली होती. मात्र पाऊस वेळेवर न पडल्याने याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला होता. शेतकऱ्यांना दुबार पेरणीच्या संकटाला समोर जावे लागले होते. त्यामुळे हे संकट टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असं कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
17 जून नंतर पेरणी करण्याचे आवाहन
गतवर्षी जूनमध्ये पेरणीयोग्य पाऊस न झाल्याने दुबारचे संकट ओढवले होते. त्यामुळे मृग नक्षत्र लागले असले तरी यंदा हे संकट उद्भवू नये, याकरिता 17 जूनपर्यंत पेरणी नकोच, असा सल्ला विदर्भातील शेतकऱ्यांना कृषी विभागाने दिला आहे. दरम्यान, अमरावती जिल्ह्यात यंदा 7 लाख 28 हजार हेक्टरवर खरीपाच्या हंगामात पिकांची लागवड होण्याचा अंदाज आहे. एकूण पेरणी क्षेत्राच्या 37 टक्के म्हणजेच 2 लाख 70 हजार हेक्टरमध्ये सोयाबीन पिकाची लागवड होण्याचा आंदाज आहे. सोयाबीन सोबतच 2 लाख 52 हजार हेक्टवर कपाशीचे पीक प्रस्तावित आहे.
सुरुवातीला पाऊस कमी झाल्यास कापसाचे पीक वाढणार
सुरुवातीला पाऊस कमी झाल्यास कपाशीच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. तुरीचे पीक अमरावती जिल्ह्यात हमखास होतेच, अशी स्थिती असल्याने आंतरपिकासाठी तुरीला सर्वाधिक पसंती आहे. यंदा 1 लाख 30 हजार हेक्टरवर तुरीचे पिक प्रस्तावित आहे, मात्र त्यामध्ये काही प्रमाणात वाढ होऊ शकते. याशिवाय 20 हजार हेक्टरमध्ये मुंग आणि 10 हजार हेक्टरमध्ये उडीद प्रस्तावित आहे. तसे पाहता, 60 दिवसांचे हे पीक मागील पाच वर्षांत शेतकऱ्यांच्या हाती लागलेले नाही. यंदा पाऊस समाधानकारक राहणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली असल्याने शेतकरी आश्वस्त आहेत. याशिवाय 22 हजार हेक्टरमध्ये ज्वारी, 4 हजार हेक्टरमध्ये धान, 15 हजार हेक्टरवर मक्का आणि 6 हजार हेक्टरमध्ये इतर पिके घेतली जाणार असल्याचा आंदाज आहे.
शेतकऱ्यांनी बियाण्यांची उगवणशक्ती तपासावी
जमिनीत किमान सात इंच ओल किंवा 100 मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरणी करु नये. बियाणे महाग आहे, त्यामुळे दुबार पेरणीचा खर्च परवडणारा नाही. शेतकऱ्यांनी 15 ते 17 जूननंतरच पाऊस पाहून पेरणी करावी आणि बियाण्यांची उगवणशक्ती तपासावी, बीजप्रक्रिया करावी. याशिवाय तीळ, तूर किंवा ज्वारी, तूर यासारखे पीकदेखील फायदेशीर ठरू शकतात. सोयाबीन सारख्या पिकाची घरच्या घरी उगवण शमता तपासावी आणि मगच पेरणी करावी असा सल्ला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे यांनी दिला आहे.
हेही वाचा - मुंबई : केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वींकडून हज तयारी, लसीकरणाच्या स्थितीचा आढावा