अमरावती - शेती पेरणीचा हंगाम हा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची बियाणे खरेदीसाठी लगबग सुरू झाली आहे. त्यातच यावर्षी बियाण्याच्या किंमती या मोठ्या प्रमाणावर वाढल्या असल्याने शेतकऱ्यांनी महामंडळाच्या महाबीजच्या सोयाबीन बियाणे खरेदीसाठी गर्दी केली आहे. मात्र, मागील वर्षीच्या तुलनेत महाबीजच्या बियाण्याचे उत्पादन कमी असल्याने शेतकऱ्यांना महाबीज बियाणे मिळणार की नाही, याबाबत शंका आहे.
मागील वर्षी महाबीज आणि इतर बियाण्यांच्या किमती या जवळपास सारख्या होत्या. त्यात मुबलक बियाणेदेखील उपलब्ध होते. मात्र, मागील वर्षी सोयाबीन उत्पादनात घट झाल्याने आता बियाण्याच्या किंमती वाढल्या आहेत. मागील वर्षी महामंडळाच्या महाबीज सोयाबीन बियाणे बॅगची किंमत 2 हजार 250पर्यंत होती. तर इतर कंपनीची देखील जवळपास इतकीच होती. मात्र, यावर्षी या कंपन्यांनी बियाण्याचे दर प्रचंड वाढवले आहे. यावर्षी 3 हजार 300 ते 4000पर्यंत बॅग मिळत असल्याने बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी महाबीजचे बियाणे खरेदी करण्यासाठी गर्दी करत आहे.
हेही वाचा - अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागात गृहविलगीकरण बंद
यंदा फक्त 150 बॅग मिळाल्या -
अमरावती येथील जुना कॉटन मार्केट परिसरात असलेल्या भूमी कल्पतरू या कृषी सेवा केंद्राला महाबीज बियाणे विकण्याची परवानगी देण्यात आली आहे. मागील वर्षी या दुकानात महाबीजने तब्बल 800 बॅग महाबीज सोयाबीनच्या दिल्या होत्या. मात्र, यावर्षी केवळ 150 बॅग दिल्याचे कृषी केंद्राचे संचालक दर्शन मुंदडा यांनी सांगितले. त्यामुळे ही गर्दी होत असल्याचे त्यांनी संगितले.
आता एका सातबाऱ्यावर फक्त दोनच बॅग -
महाबीजचे सोयाबीन बियाणे खरेदी करण्यासाठी आलेल्या काही शेतकऱ्यांनी सांगितले की, मागील वर्षी एका सातबाऱ्यावर मुबलक सोयाबीन बियाणे मिळत होते. मात्र, यावर्षी केवळ दोन सोयाबीनच्या बॅग मिळत आहेत. त्यामुळे आम्ही पेरणी कशी करायची? इतर कंपनीचे सोयाबीन खरेदी कसे करायचे? असा प्रश्नही या शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
आम्ही जेव्हा सोयाबीन विकतो तेव्हा तीन ते चार हजार रुपये क्विंटल सोयाबीन विकले. त्यात उत्पन्नात मोठी घट झाली. मात्र, ते सोयाबीन आम्हाला बियाणे म्हणून खरेदी करायच्या वेळेस नऊ ते दहा हजार रुपये क्विंटलपर्यंत घ्यावे लागत असल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले.
हेही वाचा - यास चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर विदर्भात पुढील पाच दिवस पावसाची शक्यता