अमरावती - शेतात काम करणाऱ्या मजूरावर रानडुक्कराने हल्ला केला. या घटनेत शेतमजूर गंभीर जखमी झाला आहे. अंजनगाव सुर्जी तालुक्यातील खीराळा गावातील शेतशिवरात शनिवारी सकाळी ही घटना घडली. विजय भीमराव पाचघरे (40) असे डुक्कराच्या हल्ल्यात जखमी झालेल्या शेतमजुराचे नाव आहे.
लगतच्या शेतातील मजुरांनी वाचविले प्राण -
शेतमजूर विजय भीमराव पाचघरे हे शेतकरी संजय फरकुंडे यांच्या शेतात काम करत असताना विजय पाचघरे यांच्यावर अचानक रानडुक्कराने हल्ला केला. शेताच्या आजूबाजूला असलेल्या मजुरांना विजय पाचघरे यांचा आवाज ऐकू आला असता त्यांनी पाचघरे यांना रानडुक्कराच्या तावडीतून सोडले.
ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू -
रानडुक्कराच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या विजय पाचघरे यांना शेत मजुरांनी अंजनगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. विजय पाचघरे यांच्या छातीवर गंभीर जखमा झाल्या असून डॉक्टरांनी त्यांच्यावर तातडीने उपचार केले.
परिसरात रानडुकरांचा त्रास -
खीराळा गावालगत असणाऱ्या शेतशिवार परिसरात रानडुक्करांचा त्रास वाढला आहे. पिकांचे नुकसान करणारे रानडुक्कर आता शेतकरी आणि शेतमजुरांच्या जीवसाठी धोकादायक ठरत असून वनविभागाने रानडुक्करांचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
हेही वाचा - आम्ही देखील स्वबळाचा नारा देऊ शकतो; उद्धव ठाकरेंचा काँग्रेसला टोला