अमरावती - पती पत्नीने राहत्या घरीच गळफास लावून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना तिवसा तालुक्यातील वऱ्हा येथे काल (मंगळवार) रात्री अकरा वाजताच्या दरम्यान घडली. मात्र अद्याप आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही.
नरेश श्रीराम मलकाम (४०) व पूजा नरेंद्र मलकाम (३२) असे मृत पती पत्नीचे नाव असून त्यांना एक मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. या दोघांनी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार हे मलकाम कुटुंब चांदूर रेल्वे तालुक्यातील कारला येथून वऱ्हा येथे राहायला आले होते. जवळपास ७ वर्षांपासून दोघेही शेतमजुरी करून आपला संसार चालवत होते. मात्र, अचानक त्यांनी आपल्या दोन मुला मुलींना सोडून आपली जीवनयात्रा संपवली. कुऱ्हा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला आहे. मात्र, या दोघांच्या आत्महत्याचे मूळ कारण समजू शकले नाही.