अमरावती - तिवसा मतदारसंघासाठी ०.२० दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्याचा ठराव जिल्हाधिकाऱ्यांनी पारित केला आहे, यात शंका नाही. जिथे गरज आहे तिथे पाणी मिळायला हवे. मात्र, तिवसा मतदारसंघात चक्क नदीद्वारे पाणी सोडण्याचे कुठलेही आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले नाहीत, तसे अधिकारही जिल्हाधिकाऱ्यांना नाही, असे असताना अप्पर वर्धा धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय कार्यकारी अभियंता प्रदीप पोटफोडे यांनी घेतला. आता पोटफोडे यांच्या विरुद्ध चौकशी केली जाणार असल्याचे स्पष्टीकरण जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता रवींद्र लांडेकर यांनी दिले.
अप्पर वर्धा धरणातून तिवसा मतदारसंघातील दुष्काळग्रस्त गावांना पाणी सोडण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला आणि स्वतःच तो मागे घेतल्याने आमदार यशोमती ठाकूर यांनी सोमवारी जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंत्याना चांगलेच धारेवतर धरले. सोमवारी जो काही प्रकार घडला याबाबत स्पष्टीकरण देण्यासाठी मुख्य अभियंता रवींद्र लांडेकर यांनी आज पत्रकार परिषद घेतली.
प्रत्यक्षात जिल्हाधिकाऱ्यांच्या पाणी सोडण्याचा आदेश नसताना माझ्या अनुपस्थितीत कार्यकारी अभियंता प्रदीप पोटफोडे यांनी परस्पर निर्णय घेतला. असा परस्पर निर्णय घेणाऱ्या कार्यकारी अभियंता पोटफोडे यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. आमदार यशोमती ठाकूर यांनी वापरलेली भाषा चुकीची होती. आमदार ठाकूर यांची मागणी योग्य असली तरी त्यांचे मुद्दे चुकीचे होते. त्या समजून घेण्यास तयार नव्हत्या. पाणी सोडण्यासाठी कोणताही करार, आलेला नव्हता. तिवसा नगरपंचायतला पाणी सोडण्याची व्यवस्थाच नसल्याने पाणी सोडताच येत नाही. आता पाणी सोडण्याचा सर्वस्वी निर्णय घेण्याचा अधिकार महामंडळाचा असल्याने आमदार यशोमती ठाकूर यांनी मी केवळ आमदार डॉ. अनिल बंडे यांच्या नात्यात येतो म्हणून मला लक्ष केले. याबाबत त्यांनी मला काल सायंकाळी भ्रमणध्वनीद्वारे सांगितले, असेही रवींद्र लांडेकर म्हणाले.