अमरावती : आजन्म ब्रह्मचारी राहू; मात्र राष्ट्रवादी काँग्रेस सोबत युती करणार नाही, असे म्हणणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेससोबत आता युती केली आहे. त्यांना यासंदर्भात प्रश्न विचारायलाच हवा. भाजपावाले काय बोलतील आणि काय करतील याचा काही एक नेम नाही. यामुळेच आता एकनाथ शिंदे हे किती दिवस मुख्यमंत्री राहतील, हे काही सांगता येत नाही. त्यांच्याच पक्षातले वाचाळ आता एकनाथ शिंदेंचे काही खरे नाही, असे बोलत सुटले असल्याचे शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी अमरावतीत म्हटले आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त अमरावतीच्या रवी नगर शिवसेना शाखेच्या वतीने आयोजित एका कार्यक्रमानिमित्त त्या मंगळवारी सायंकाळी अमरावतीत आल्या होत्या.
अजित पवार मुख्यमंत्री झाले तर चांगलेच : आता 30 तारखेपर्यंत आणखी एका गोष्टीचा स्फोट होणार असे भाजप मधल्याच नेत्याने म्हटले आहे. एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद जाऊन अजित पवार हे कदाचित मुख्यमंत्री होऊ शकतात. लोकसेवा आयोग आणि निवडणूक आयोग याचा किमान अर्थ अजित पवार यांना कळतो. त्यामुळे अजित पवार हे मुख्यमंत्री झाले तर अधिक चांगले होईल, असा टोला सुषमा अंधारे यांनी कार्यक्रमाला उपस्थित शिवसैनिकांना संबोधित करताना लगावला.
अशांना भाजपा करत आहेत साईडलाईन : म्हात्रे, सुर्वे व्हिडिओ प्रसारित झाला त्यावेळी तो व्हिडिओ खोटा आहे, असे सांगण्यात आले. त्या प्रकरणात अनेकांना सरकारने अटक केली. तो व्हिडिओ खोटा होता; मग खरा व्हिडिओ कोणता? तो आजपर्यंत समोर आला नाही. त्या प्रकरणात सर्व दडवण्याचा प्रयत्न झाला असला तरी किरीट सोमैयांबाबत तसे काही झाले नाही. किरीट सोमैयांबाबत प्रसारित झालेला व्हिडिओ हा खरा असल्याचे भाजपच्या गृह खात्याने जाहीर केले. लोकांची ईडी लावणाऱ्यामागे त्यांच्याच पक्षाचे लोक सीडी लावून होते. पक्षात जी मंडळी गोंगाट घालणारे आहेत, अशांना भाजपा हळूहळू दूर सारत आहे. यामध्ये आमचे कोकणातील नारायण राणे आणि त्यांच्या मुलांचाही समावेश असल्याचे सुषमा अंधारे म्हणाल्या. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांची देखील उपयुक्तता भाजपसाठी संपली आहे. यामुळेच अनेक प्रकरणांचा एका रात्रीत निकाल लावणाऱ्या भाजपाने नवनीत राणा यांच्या जातीच्या खोट्या प्रमाणपत्राच्या निकालाची तलवार टांगतीच ठेवली असल्याचे देखील सुषमा अंधारे म्हणाल्या.
हेही वाचा: