अमरावती Donkey Milk : आतापर्यंत तुम्ही गाय, म्हैस आणि बकरीचं दूध पिण्याबद्दल ऐकले असेल, इतकंच नाही तर उंटाचं दूध पिण्याबद्दलही तुम्ही ऐकलं असेल. पण अमरावती शहरात गाढविणीचं दूध विकायला आलंय. गाढविणीच्या दुधाचा दर प्रती लिटर तब्बल आठ हजार रुपये आहे. शहरात विकायला आलेलं गाढविणीचं दूध सध्या कुतूहलाचा विषय ठरतंय. गाढविणीचं दूध विकण्यासाठी अमरावती शहरात तब्बल दहा गाढविणी घेऊन दाखल झाल्याची माहिती एका गाढविणीच्या मालकिनीनं 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिलीय. गाढविणीचं दूध हे खूपच लाभदायक आहे. अस्थमा, दमा, खोकला आणि लहान मुलांच्या आजारावर हे दूध गुणकारी असल्याचा दावा गाढविणीचं दूध विकणाऱ्या महिलेनं केलाय.
दहा जणांचा समूह शहारात दाखल : तेलंगणा राज्यातील आदिलाबाद इथून गाढविणीचं दूध विकण्यासाठी दहा जणांचा एक समूह आपल्या गाढविणींसह अमरावती शहरात दाखल झालाय. शहरभर फिरुन ही मंडळी 'गधीचं दुध घ्या हो... दूध दूध' म्हणत विक्री करण्याचा प्रयत्न करत आहेत. आपला आवाज दूरवर पोहोचावा यासाठी त्यांनी छोटासा लाऊड स्पीकरही सोबत ठेवलाय. शहरात गाढविणीचं दूध विकायला आल्यानं अमरावतीकर त्यांच्याकडं उत्सुकतेनं पाहत आहेत.
अनेक आजारांवर रामबाण उपाय : लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच गाढविणीचं दूध गुणकारी असल्याचं या महिलेनं सांगितलं. दम, सर्दी, खोकला, जंत अशा विविध आजारांवर हे दुध रामबाण उपाय असल्याचं सांगितलं जातय. आजपर्यंत कोणत्याही डॉक्टरांनी गाढविणीचं दूध फायदेशीर किंवा गुणकारी असल्याचं सांगितलं नाही, असं विचारलं असता डॉक्टर मंडळीसुद्धा आमच्याकडून दूध विकत घेत असल्याचं या दूध विक्रेत्यांनी सांगितलं. बंगळुरुपासून नागपूरपर्यंत अशा विविध ठिकाणी आतापर्यंत दूध विकल्याचं त्यांनी सांगितलं. दिवसभरात एक गाढवीण फक्त एक पाव लिटर दुध देते. पाच गाढविणींचं मिळून दिवसभरात साधारणतः एक लिटर दूध होते. एका दिवसाला एक हजार रुपये मिळत असल्याचं गाढविणीचं दूध विकणाऱ्या महिलांनी सांगितलं.
गाढविणीच्या दूधाचा विक्री करणारा आहे स्टार्टअप : गाढविणीच्या दुधाच्या ग्राहकांकडून चांगली मागणी होती. हे लक्षात घेऊन टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समधून एमए केल्यानंतर दिल्लीतल्या पूजा कौलनं स्टार्टअपदेखील सुरू केला आहे. त्यांनी महाराष्ट्रातील कोल्हापूरमध्ये ज्यांच्याकडे गाढव होते, अशा शेतकऱ्यांना एकत्र केलं. त्यांनी गाढविणीचं दूध सामान्य माणसांना विकण्यासाठी एक मॉडेल विकसित केलंय. सुरुवातीला ते अपयशी ठरलं, पण त्या थांबल्या नाहीत. त्यांनी काही मित्रांसोबत ऑर्गेनिको नावाचं स्टार्टअप सुरू केलं. त्या माध्यमातून ते गाढविणीच्या दूधापासून त्वचाशी संबंधित उत्पादनं बनवून विकतात.
हेही वाचा :